दैनिक चालू वार्ता प्रतिनिधी – स्वरूप गिरमकर
वाघोली ता.18 शिक्रापूर : कोरेगाव भीमा (ता.शिरुर) येथील वेश्याव्यवसाय सुरु असलेल्या हॉटेलवर शिक्रापूर पोलिसांनी छापा टाकला. या कारवाईत पोलिसांनी तिघांना अटक करत 16 वर्षीय तरुणीसह तीन महिलांची सुटका केली. पोलिसांनी याप्रकरणी वेश्याव्यवसाय चालवणाऱ्या सचिन पंडित विधाटे, शंकर लालबहाद्दुर चेत्रे व अमोल रामदास डहाळे या तिघांना अटक केली.
कोरेगाव भीमा (ता. शिरुर) येथे पुणे-नगर महामार्गालगत हॉटेल सावली येथे एका तरुणीसह काही महिलांकडून वेश्याव्यवसाय करुन घेतला जात असल्याची माहिती पोलीस निरीक्षक प्रमोद क्षीरसागर यांना मिळाली. त्यांनतर त्यांनी स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे पोलीस निरीक्षक अविनाश शिळीमकर यांना माहिती देत स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक राहुल गावडे, पोलीस शिपाई सागर धुमाळ, शिक्रापूरचे पोलीस उपनिरीक्षक अविनाश थोरात, यांसह काही सामाजिक कार्यकर्ते तसेच महिला पोलिसांचे पथक तयार करुन सावली हॉटेल येथे पाठवून एका बनावट ग्राहकाला हॉटेलमध्ये पाठवले. त्यावेळी तेथे वेश्याव्यवसाय सुरु असल्याचे निदर्शनास आले.
दरम्यान, पोलिसांच्या पथकाने तेथे छापा टाकला असता त्यांना येथे तिघे एका 16 वर्षीय अल्पवयीन तरुणीसह दोन महिलांकडून वेश्याव्यवसाय करुन घेत असल्याचे समोर आले. यावेळी पोलिसांच्या पथकाने 16 वर्षीय अल्पवयीन मुलीसह दोन महिलांना तसेच व्यवसाय करुन घेणाऱ्या तिघांना ताब्यात घेत कारवाई केली.