नवी दिल्ली : चीनमधील हांगझोऊ येथे होणाऱ्या 19 व्या आशियाई क्रीडा स्पर्धेत भारतीय पुरुष आणि महिला क्रिकेट संघ थेट उपांत्यपूर्व फेरीत खेळणार आहेत. आशियाई क्रीडा स्पर्धा 2023 चे वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे.भारतीय संघ पहिल्यांदाच आशियाई क्रीडा स्पर्धेत सहभागी होणार आहे. चला तर मग जाणून घेऊया आशियाई क्रीडा स्पर्धेत भारतीय पुरुष आणि महिला संघ त्यांचा पहिला सामना कधी खेळणार…
ऋतुराज गायकवाड टीम इंडियाचा कर्णधार…
आशियाई क्रीडा स्पर्धेचा 19 वा हंगाम 19 सप्टेंबरपासून सुरु होणार आहे. या स्पर्धेत एकूण 40 विविध गेम्स होणार आहेत. या स्पर्धेची सांगता 8 ऑक्टोबर रोजी होणार आहे. आशियाई क्रीडा स्पर्धेत भारतीय क्रिकेट संघाचं नेतृत्व स्टार युवा फलंदाज ऋतुराज गायकवाड करणार असून आयपीएल आणि देशांतर्गत क्रिकेटमध्ये चमकदार कामगिरी करणाऱ्या खेळाडूंना संघात संधी मिळाली आहे.
टीम इंडिया 3 ऑक्टोबरला पहिला सामना खेळणार आहे…
आशियाई क्रीडा स्पर्धा टी-20 फॉरमॅटमध्ये खेळवली जाईल. सर्व सामने झेजियांग युनिव्हर्सिटी ऑफ टेक्नॉलॉजी पिंगफेंग क्रिकेट मैदानावर खेळवले जातील. भारत, पाकिस्तान, श्रीलंका आणि बांगलादेश यांनी त्यांच्या क्रमवारीच्या आधारे उपांत्यपूर्व फेरीसाठी आधीच पात्र ठरले आहेत. टीम इंडिया 3 ऑक्टोबर रोजी आपला पहिला सामना खेळणार आहे.
दुसरीकडे, हरमनप्रीत कौर भारतीय महिला संघाची कर्णधार असेल, तर सलामीवीर फलंदाज स्मृती मानधना उपकर्णधार. या संघात जेमिमाह रॉड्रिग्स, शफाली वर्मा, दीप्ती शर्मा आणि ऋचा घोष यांसारख्या इतर स्टार्सचाही समावेश आहे. महिला क्रिकेट स्पर्धा 19 ते 28 सप्टेंबर दरम्यान होणार आहे. आशियाई क्रीडा स्पर्धेत गेम्स म्हणून क्रिकेटचा समावेश होण्याची ही केवळ तिसरी वेळ असेल.