दैनिक चालु वार्ता
इंदापूर प्रतिनिधी-बापु बोराटे
पुणे (इंदापूर):होळी दहनानंतर पुणे जिल्ह्यामध्ये सोमवारी (दि.२५) मार्च रोजी धुळीवंदनानिमित्त रंगांची उधळण करण्यात आली. शहरी भागासह ग्रामीण भागात ठिकठिकाणी हा उत्सव मोठ्या जल्लोषात साजरा करण्यात आला. आबालवृद्धांपासून सर्वांनीच या उत्सवाचा आनंद मनमुरादपणे लुटला.
पुणे जिल्ह्यामध्ये २४ मार्च रोजी होळी उत्सव साजरा करण्यात आला.शहारातील अष्टविनायक सिटी व अविष्कार सोसायटीमध्ये मोठ्या उत्साहामध्ये हा सण साजरा करण्यात आला. पूरणपोळीचा नैवेद्य दाखवित होळीची मनोभावे पूजा करण्यात आली. त्यानंतर रात्री होळीचे दहन करीत बोंब मारण्यात आली. दुसर्या दिवशी सोमवारी धुळीवंदननिमित्त अनेकांनी रंगाची उधळण केली. एकमेकांच्या अंगावर रंग उडवून हा उत्सव साजरा केला. यावेळी पारंपरिक नृत्यांचे सादरीकरण करीत होळी रे होळी… पुरणाची पोळी… अशी आरोळी ठोकण्यात आली.
विशेष म्हणजे, मोबाईलमध्ये मग्न असणारी बच्चेकंपनी व तरुणाई बरोबरच अबालवृद्धही यावेळी स्वखुशीने या उत्सवात सहभागी झाल्याचे दिसून आहे. ढोलताशा,डीजेच्या तालावर यावेळी नाचगाणी करण्यात आली. दरम्यान, एकमेकांच्या अंगावर पाणी उडविण्याबरोबरच रंगांची उधळण करण्यात येत होती. यावेळी जल्लोष आणि उत्साहाचे वातावरण होते. दरम्यान, पर्यावरणपूरक रंगांना तरुणाईने अधिक पसंती दिल्याचे दिसून आले.यावेळी महिलांनी मोठ्या संख्येने सहभागी होऊन रंगाची उधळण करत आनंद उत्सव साजरा केला.