शनिवारी इंदापूर येथे महाविकास आघाडीची जाहीर सभा…
दैनिक चालु वार्ता
इंदापूर प्रतिनिधी-बापु बोराटे
पुणे (इंदापूर): संपूर्ण देशामध्ये लोकसभेचे वातावरण तापलेले आहे, आणि संपूर्ण देशाचे लक्ष लागलेले लोकसभा मतदारसंघ म्हणजे बारामती लोकसभा मतदारसंघ आहे. या मतदारसंघांमध्ये सुप्रियाताई सुळे यांनी गेल्या दोन महिन्यापासून सर्व गाव भेट दौरे करून प्रचारामध्ये आघाडी घेतली आहे. २३ मार्च शनिवार रोजी महाविकास आघाडीच्या उमेदवार सुप्रियाताई सुळे यांच्या प्रचारार्थ व राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये पडलेल्या फुटीनंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची इंदापूरात पहिली जाहीर सभा होणार आहे. ही सभा इंदापूर येथील इंदापूर पोलिस स्टेशन समोरील जुनी कृषी उत्पन्न बाजार समिती इंदापूर येथे होणार असल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार गटाचे तालुका कार्याध्यक्ष महारूद्र पाटील यांनी दिली आहे.
केंद्र सरकारच्या मनमानी कारभारामुळे शेतीमालाला हमीभाव मिळत नाही. महागाई वाढत असून सर्वसामान्यांना जगणे अवघड झाले आहे. म्हणून केंद्र सरकारच्या धोरणाविरोधात आवाज उठविण्यासाठी व लोकसभेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीच्या वतीने या सभेचे आयोजन करण्यात आले आहे. या सभेच्या आयोजना संदर्भात महाविकास आघाडीची पत्रकार परिषद पार पडली यावेळी ते बोलत होते.या पत्रकार परिषदेला महाविकास आघाडीचे सर्व स्थानिक नेते उपस्थित होते .
याबाबत अधिक माहिती देताना महारूद्र पाटील म्हणाले या सभेला उद्धव ठाकरे गटाचे नेते खासदार संजय राऊत, काँग्रेसचे नेते माजी मंत्री बाळासाहेब थोरात,भोरचे आमदार संग्राम थोपटे, पुणे जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष व पुरंदर हवेलीचे आमदार संजय जगताप, उद्योजक श्रीनिवास पवार , युवा नेते युगेंद्र पवार त्याचबरोबर बारामती लोकसभेच्या खासदार सुप्रियाताई सुळे तसेच या सभेला महाविकास आघाडीचे अनेक महत्त्वाचे नेते उपस्थित राहणार आहेत.
यावेळी केंद्र सरकारच्या धोरणांवर हल्लाबोल करताना राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष ॲड .तेजसिंह पाटील म्हणाले, मोदी सरकारचा विकास रथ जनता हाकलून देत आहे. केंद्र आणि राज्य सरकारला जाग आणणे गरजेचे आहे. मोठ्या उद्योगपतींचे मोठे कर्ज माफ केले जाते. मग शेतकऱ्यांचे कर्ज का माफ होत नाही, असा सवाल पाटील यांनी उपस्थित केला. सभेच्या निमित्ताने महाविकास आघाडी म्हणून सगळ्यांनी एकजूट दाखवणे गरजेचे असल्याचे देखील त्यांनी सांगितले.
यावेळी यावेळी ॲड. तेजसिंह पाटील, महारुद्र पाटील तसेच शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे महादेव सोमवंशी पत्रकारांशी बोलत होते. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अशोक घोगरे, जिल्हा संपर्कप्रमुख अमोल मुळे, प्रदेश कार्यकारी सदस्य अमोल भिसे, दादासाहेब थोरात, सुनिल खाडे, अक्षय कोकाटे, संजय शिंदे, राजुभैय्या शेख, सिकंदर बागवान, विकास खिलारे यांच्यासह महाविकास आघाडीतील कार्यकर्ते पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.