दै.चालु वार्ता
उदगीर, प्रतिनिधी अविनाश देवकते
लातूर/उदगीर:-भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांची आज उदगीर शहरात सभा आयोजित करण्यात आलेली आहे. त्या अनुषंगाने काल महायुतीच्या सर्वच पक्षातील प्रमुख कार्यकर्त्यांचा मेळावा आयोजित करण्यात आला होता. सदरील सभा यशस्वी करण्यासाठी, सर्वांनी भरभरून प्रतिसाद द्यावा अशा सूचना महायुतीच्या सर्व कार्यकर्त्यांना देण्यात आला.
मोदींना तिसऱ्यांदा प्रधानमंत्री करण्यासाठी, श्रृंगारेना विजयी करावेच लागेल – मंत्री बनसोडे
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात, देशाचा होत असलेला विकास पाहून आमचे नेते राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी महायुतीत सहभागी होण्याचा मोठा निर्णय घेतला आहे. आता, मोदींना तिसऱ्यांदा प्रधानमंत्री करण्यासाठी, श्रृंगारेना विजयी करावेच लागेल असे आवाहन यावेळी राज्याचे क्रीडा व युवक कल्याण बंदरे मंत्री संजय बनसोडे यांनी कार्यकर्त्याला केले. देशाला आर्थिक महासत्ता बनविण्यासाठी आपला एक खासदार लोकसभेत गेला पाहिजे. अशा जिद्दीने महायुतीच्या सर्व कार्यकर्त्यांनी काम करावे अशा मार्गदर्शक सूचना त्यांनी यावेळी केल्या आहेत.
पंतप्रधान मा. नरेंद्र मोदीजींनी सर्वसामान्यांना केंद्रस्थानी ठेवून अनेक लोककल्याणकारी योजना राबवल्या. सर्वसामान्य शेतकरी व कष्टकरी वर्ग अधिक समृद्ध व्हावा यासाठी महायुती सरकार अविरतपणे काम करीत आहे. यामुळे हे सरकार पुन्हा सत्तेत येण्यासाठी लातूर लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार मा. सुधाकरराव श्रृंगारे यांना प्रचंड मताधिक्याने विजयी करणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे. यासाठी महायुतीच्या घटकपक्षातील सर्वच कार्यकर्त्यांनी मनगटात जिद्द ठेवून महायुतीच्या विजयासाठी आपआपल्या परीने प्रयत्न करायचे आहेत आणि आपला संकल्प तडीस घेऊन जायचा आहे असे आवाहन याप्रसंगी केले.
रघूकूल मंगल कार्यालय उदगीर येथे महायुतीचे उमेदवार मा. सुधाकरराव श्रृंगारे यांच्या प्रचारार्थ भारतीय जनता पार्टी, शिवसेना शिंदे गट व राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे सरपंच, उपसरपंच, चेअरमन व प्रमुख पदाधिकारी यांची बैठक पार पडली. याप्रसंगी अनेक बाबी अधोरेखित करीत पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन केले.