
दैनिक चालु वार्ता,
जव्हार प्रतिनिधी
दिपक काकरा
जव्हार:- राष्ट्रीय किसान दिनाचे औचित्य साधून ग्रामीण भागात काम करणाऱ्या आरोहन या संस्थेने मोखाडा सारख्या आदिवासी ग्रामीण तालुक्यात स्थानिक शेतकऱ्यांच्या सोबत 23 डिसेंबरला किसान दिन मोठ्या उत्साहात साजरा केला.या वेळी शेतकऱ्यांसोबत आरोहन संस्थेच्या पुढाकाराने मोखड्यातील विविध गावातून महिलांनी व पुरुषांनी या किसान दिनी कार्यक्रमात आपला सहभाग नोंदवला.संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अमित नारकर यांनी कार्यक्रमाची सुरुवात करताना शेतकऱ्यांना किसान दिनाच्या शुभेच्छा देतांना देशाच्या अर्थव्यवस्थेत शेतकऱ्यांची भूमिका किती महत्त्वाची आहे याची माहिती देऊन बळीराजा प्रति कृतज्ञता व्यक्त केली व किसन दिनानिमित्त ग्रामीण भागातील शेतकऱ्यांचे आभार मानले तसेच रब्बी हंगामातील शेती विषयी संस्थेचे भरत कुशारे यांनी मोगरा शेती,उन्हाळी भाजीपाला लागवड याबाबत शेतकऱ्यांना सखोल मार्गदर्शन करून आडोशी येथे शेतकऱ्यांच्या शेतात बटाटा लागवडीचे प्रात्यक्षित पार पडले.या कार्यक्रमावेळी आरोहनचे प्रकल्प व्यवस्थापक नितेश मुकणे,कौस्तुभ घरत तसेच आरोहण संस्थेचे इतर सदस्य व परिसरातील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.