
दैनिक चालु वार्ता
परमेश्वर वाव्हळ
पिंपरी प्रतिनिधी
पुणे :- मॉडर्न एज्युकेशन सोसायटीच्या नौरोसजी वाडिया महाविद्यालयात सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त सांगली येथील महिला बाल विकास अधिकारी सुवर्णा पवार यांच्या हस्ते सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून ‘ मराठी भाषा संवर्धन पंधरवडा दिनाचे उद्घाटन’ करण्यात आले. यावेळी कार्यक्रमाचे प्रास्ताविक नेस वाडिया महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. वृषाली रणधीर यांनी केले. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी नौरोजी वाडिया महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. प्रवीण भदाने होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक करताना डॉ. वृषाली रणधीर म्हणाल्या, ” प्रत्येक विद्यार्थ्याला मराठी भाषेची जाणीव असली पाहिजे. सावित्रीबाई फुले आणि महात्मा ज्योतिबा फुले यांनी मराठी भाषेचे कर्तेपण आपल्या लेखणीतून सिद्ध करून दाखविले आहे. ज्या मातीत आपण जन्मलो, वाढलो, घडलो, लहानाचे मोठे झालो, त्या आपल्या मराठी मातीशी आपण प्रामाणिक राहिले पाहिजे. मराठी साहित्याचे वाचन केले पाहिजे. आपल्या आईची भाषा आपल्या सर्वांना अवगत असली पाहिजे.