
दैनिक चालु वार्ता, वृत्तसेवा
मुंबई : – या भेटीनंतर उदयनराजेंनी केलेल्या विधानानं अनेकांच्या भुवया उंचावल्या. अन् त्यांच्या या विधानामुळे राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले. मात्र, या भेटीबाबत आता स्वत: अजित पवार यांनी माहिती दिली. तसेच, या भेटीत कुठलाही राजकीय हेतू नव्हता असेही त्यांनी स्पष्ट केले. भारतीय जनता पक्षाचे खासदार उदयनराजे भोसले आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांची पुण्यातील विश्रामगृहात बैठक झाली.
सातारा शहराची हद्दवाढ झाली आहे. त्यामुळे, सातारा महापालिकेला निधी मिळण्यासाठी, निधीसंदर्भातील चर्चा करण्यासाठी ते आले होते. या भेटीत कुठलाही राजकीय उद्देश नसून घरवापसीचा विषय नाही, असे अजित पवार यांनी स्पष्टपणे सांगितले. विकासकामांबाबत तसेच नगरपरिषदेच्या नवीन वाढीव हद्दीतील विकास कामांना प्राथमिक सोयी सुविधा अंतर्गत अनुदान मिळणेबाबत त्यांनी आज उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेतली होती. तसेच प्रस्तावाद्वारे मागणी केली. अजितदादा-उदयनराजे भेटीमुळे मात्र राजकीय वर्तुळात खळबळ उडाली.
सातारा नगरपरिषद ही ‘अ’ वर्ग नगरपरिषद असून नुकतीच सातारा नगरपरिषदेची हद्दवाढ झालेली आहे. त्यामुळे २१.०४ चौ.कि.मी. इतके क्षेत्र वाढ होऊन एकुण २९.१९ चौ.कि.मी. इतके झाले आहे. हद्दवाढ झालेल्या क्षेत्राचे संपुर्ण सर्वेक्षण करण्यात आले असून या भागातील आवश्यक त्या रस्ते, गटारी, पथदिवे व ओपन स्पेस विकसीत करणे इ. प्राथमिक सोयी सुविधा पुरविण्यसाठी पहिल्या टप्प्यातील कामांची अंदाजपत्रके नगरपरिषदेने केली आहेत. त्याची एकुण किंमत रु.४,८५० लक्ष इतकी आहे.
सदरचा भाग हा मूळ हद्दीपेक्षा जवळपास तिप्पट एवढा असून त्या भागातील सुमारे ६०३७३ इतक्या लोकसंख्येस पायाभूत सुविधा पुरविणे आर्थिकदृष्ट्या नगरपरिषदेस शक्य नाही, त्यामुळे नव्याने हद्दीत आलेल्या भागामध्ये प्राथमिक सोयी सुविधा पुरविणेसाठी शासनाच्या विभागाकडुन अनुदान प्राप्त होते, त्या अंतर्गत सातारा नगरपरिषदेस रू.४,८५० लक्ष इतका निधी मंजुर करावा ही मागणी उदयनराजेंनी केली होती.