
दैनिक चालु वार्ता, वृत्तसेवा
होशियारपूर :- पंतप्रधान नरेंद्र मोदी विरोधात असताना नेहमी काळ्या पैशाबद्दल बोलायचे, पण सध्या कोणत्याच सभेत काळ्या पैशावर बोलताना का दिसत नाहीत, असा सवाल राहुल गांधी यांनी केला आहे. पंजाबातील येथील प्रचारसभेत बोलताना राहुल गांधी यांनी हा सवाल केला. मोदींनी जीएसटी आणि नोटबंदी लागू केली. पण त्याचा लाभ देशातील केवळ दोन-तीन अब्जाधिशांनाच झाला आहे, असे ते म्हणाले.
पंजाबात कॉंग्रेसने गरिबांचे दुःख समजून घेणारा मुख्यमंत्री दिला आहे, असा दावा करून राहुल गांधी यांनी यावेळी नमूद केले की, चन्नींना गरिबी माहिती आहे. त्यांनी ती भोगली आहे. त्यामुळे त्यांच्या नेतृत्वापासून राज्यातील छोटे व्यापारी, छोटे उद्योजक, मध्यम व गरीब वर्गाला निश्चित लाभ होईल. राज्यातील अब्जाधिशांच्या हितासाठीच ते काम करणार नाहीत अशी ग्वाहीही त्यांनी दिली.
मोदींनी देशात दरवर्षी दोन कोटी लोकांना रोजगार देण्याची घोषणा केली होती.
विदेशातून काळा पैसा परत आणण्याची ग्वाही दिली होती. आता ते यावर काहीच बोलत नाहीत. देशात रोजगाराची संधी नसल्याने देशातील युवक नैराश्यग्रस्त झाला आहे. त्या युवा वर्गाला न्याय देण्याचे काम आता करायचे आहे. हे काम पंजाबातील कॉंग्रेसचे सरकार करील असे आश्वासनही राहुल गांधी यांनी यावेळी दिले. आम आदमी पक्षावर टीका करताना ते म्हणाले की, या पक्षाला अजून पंजाब कळालेलाच नाही. ज्यांना राज्याच्या समस्याच माहिती नाहीत ते राज्याच्या हिताचे काम करू शकणार नाहीत, असा दावाही राहुल गांधी यांनी यावेळी केला.