
दैनिक चालु वार्ता
पिंपरी प्रतिनिधी
परमेश्वर वाव्हळ
पुणे :- सुरक्षा रक्षक मंडळातील सुरक्षा रक्षकांच्या कोणत्याही मागण्या मान्य होत नसल्याने क्रांतिकारी सुरक्षा रक्षक संघर्ष समिती व समन्वयक पत्रकार सतिष एस. राठोड हे आपल्या पदाधिकाऱ्यांसह १९ फेब्रुवारी पासून उपोषणास आझाद मैदान मुंबई येथे बसले असून सरकारने सुरक्षा रक्षकांच्या मागण्या त्वरित मान्य कराव्या अन्यथा याचे पडसाद येणाऱ्या निवडणुकीत दिसेल, असा इशारा दिला आहे. उपोषणाच्या तिसऱ्या दिवशी राठोड यांची प्रकृती बिघडल्याने त्यांना जे जे रुग्णालय येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले होते.
उपोषणकर्ते यांनी गेल्या १९ फेब्रुवारी पासून अन्न व पाण्याचा त्याग केला आहे, तरीही सरकार तसेच कामगार विभाग जागे होत नसल्याचे समितीचे समन्वयक सतिष एस.राठोड यांनी सांगितले. समितीच्या तसेच विविध संघटनेच्या वतीने विशेषतः क्रांतिकारी सुरक्षा रक्षक संघर्ष समिती मधील संलग्न संघटनेने अनेक पत्रव्यवहार केले असून, सुद्धा सुरक्षा रक्षकांच्या मूलभूत मागण्यांकडे सरकार दुर्लक्ष करत आहे. तसेच ९ फेब्रुवारी व १४ फेब्रुवारी रोजी ‘क्रांतिकारी सुरक्षा रक्षक संघर्ष समिती’च्या वतीने पत्रव्यवहार करूनही महाराष्ट्रातील सुरक्षा रक्षकांच्या व्यथा काही कमी होतांना दिसत नाहीत.
कामगार प्रशासनातील प्रशासक सुरक्षा रक्षकांच्या समस्या सोडविण्यासाठी उदासीन दिसत आहे. तसेच सुरक्षा रक्षकांच्या हक्काच्या मागण्या मान्य कराव्यात अन्यथा सदर उपोषणाचे परिणाम येत्या काळातील निवडणुकीत दिसून येतील. राज्यात एस.टी कामगारांच्या संपामुळे आधीच अस्थिरता निर्माण झालेली आहे. शासनाने सुरक्षा रक्षकांना छेडू नये अन्यथा राज्यात अराजकता माजेल व याची सर्वस्वी जबाबदारी ही महाराष्ट्र शासन तसेच संबंधित कामगार मंत्री व कामगार खात्यातील सर्व अधिकारी यांची असेल.असा इशाराही सुरक्षा रक्षक संघर्ष समितीचे समन्वयक सतिष एस.राठोड यांनी सरकारला दिला आहे.