
दैनिक चालु वार्ता, वृत्तसेवा
पुणे :- पुण्यातील एका कार्यक्रमात बोलताना राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवारांनी सुशीलकुमार शिंदे यांची राजकारणातील सुरूवातीचा प्रवास कसा खडतर होता ते सांगितलं आहे. यावेळी शरद पवार आणि खासदार श्रीनिवास पाटील यांच्या हस्ते ज्येष्ठ पत्रकार मधुकर भाव यांचा सत्कार करण्यात आला. सुशीलकुमार शिंदे यांनी बोलताना शरद पवार यांच्यासोबत आपली राजकीय कारकीर्द पुढे सुरू ठेवली नाही, याविषयी खंत वाटते, असं म्हटलं आहे.
त्याविषयी पवारांनी कधीही शब्दाने विचारलं नाही, असंही सुशीलकुमार शिंदे यांनी म्हटलंय. त्यावर शरद पवारांनी सुशीलकुमार शिंदेंचा राजकारणातील सुरूवातीचा संघर्ष सांगितला आणि अशी खंत मनात ठेवू नका, असं म्हटलं आहे. तुम्ही काँग्रेससोबत आहात. गांधी नेहरूंच्या विचारासोबत तुम्ही आहात. तो आमचाही विचार आहे. त्यामुळे तुम्ही आमच्यापासून दूर गेलेला नाही, असं शरद पवारांनी म्हटलं आहे. शिंदे यांनी अनेक पदे आजपर्यंत भूषवली आहेत. मात्र, त्यांची राजकीय कारकीर्द खडतर आहे, असं शरद पवारांनी सांगितलं आहे. शिंदे यांनी वकिलीच शिक्षण घेतलं होतं. पोलिस दलात फौजदार होते, असं पवारांनी सांगितलं.
सुशीलकुमार शिंदे यांनी राजकारणात यावं यासाठी आमचे प्रयत्न सुरू होते. करमाळा मतदार संघासाठी त्यांच्या नावाची शिफारस करण्यात आली होती. त्यासाठी त्यांना नोकरीचा राजीनामा द्यावा लागला होता. त्यांचं नाव काँग्रेसच्या यादीत होते. मात्र, तत्कालीन काँग्रेस नेते बाबू जगजीवनराम यांनी त्यांच्या नावाला विरोध केला होता. विद्यमान आमदार सोनवणे यांना उमेदवारी मिळाली, असं शरद पवारांनी सांगितलं. दरम्यान, आम्ही इंदिरा गांधींची भेट घेतली. जगजीवनराव यांना विरोध करू नका, असं त्यांनी सांगितलं. आमचाही नाईलाज झाला होता. विमानतळावर आल्यावर मला अश्रू अनावर झाले होते. कारण माझ्यामुळेच शिंदे यांची सरकारी नोकरी गेली होती. त्यांना संकटात टाकल्याबद्दल मला खंत वाटत होती, असा किस्सा शरद पवारांनी सांगितला आहे.