
दैनिक चालु वार्ता, वृत्तसेवा
वाराणसी :- उत्तर प्रदेश विधानसभा निवडणूक निकालांसाठी काही तासांचा अवधी असतानाच एव्हीएम मशिनवरून जोरदार राजकारण सुरू झालं आहे. ईव्हीएम मशिनच्या सुरक्षेवरून मोठा प्रश्न उपस्थित करण्यात आला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा लोकसभा मतदारसंघ असलेल्या वाराणसीमध्येच हा प्रकार घडल्याने समाजवादी पक्षानं रान उठवलं आहे. त्यातच वाराणसीच्या आयुक्तांनीच प्रोटोकॉलमध्ये त्रुटी राहिल्याची कबुली दिल्यानं खळबळ उडाली आहे.
देशातील पाच राज्यांतील विधानसभा निवडणुकांचा निकाल गुरूवारी (ता. 9) रोजी जाहीर होणार आहे. संपूर्ण देशाच्या नजरा प्रामुख्याने उत्तर प्रदेशाच्या निकालाकडे लागल्या आहे. एक्झिट पोलमध्ये भाजपच्या (BJP) जागा कमी होणार असल्या तरी पुन्हा सत्ता मिळणार असल्याचे दिसत आहे. पण समाजवादी पक्षाने हे एक्झिट पोल फेटाळून लावले आहेत. भाजपकडून ईव्हीएममध्ये छेडछाड केली जाऊ शकते असा आरोप करत सपाचे नेते, कार्यकर्ते ईव्हीएम मशिन ठेवलेल्या ठिकाणी रात्रंदिवस पहारा देत आहेत.