
दैनिक चालु वार्ता, वृत्तसेवा
नवी दिल्ली :- “पाकिस्तानचे पंतप्रधान म्हणून निवड झाल्याबद्दल एच. ई. मियान मोहम्मद शहबाझ शरीफ यांचं अभिनंदन. भारताला या प्रांतामध्ये शांतता आणि स्थैर्य अपेक्षित असून हा प्रांत दहशतवादमुक्त राहील अशी अपेक्षा आहे. असं झाल्यास आपण विकासकामांमधील आव्हानांवर लक्ष केंद्रित करु शकू आणि त्या माध्यमातून आपल्या लोकांचं भलं करण्याबरोबरच संपन्नता प्रदान करता येईल,” अशा शब्दांत मोदींनी शरीफ यांना ट्विटरवरून शुभेच्छा दिल्या होत्या.
शरीफ यांचं उत्तर!
दरम्यान, शहबाझ शरीफ यांनी आज दुपारी पंतप्रधान मोदींच्या शुभेच्छांना उत्तर दिलं आहे. मोदींचे आभार मानतानाच शरीफ यांनी सूचक शब्दांत काश्मीरचा उल्लेख न करता आपली भूमिका मांडली आहे. “पंतप्रधान मोदी यांनी दिलेल्या शुभेच्छांसाठी धन्यवाद. पाकिस्तानची इच्छा आहे की भारतासोबत शांततापूर्ण आणि सहकार्याचे संबंध राहावेत.
दोन्ही देशांमधील जम्मू-काश्मीरसारख्या अनेक प्रलंबित मुद्द्यांवर शांततापूर्ण पद्धतीने मार्ग निघणं अपरिहार्य आहे. दहशतवादाशी लढा देताना पाकिस्ताननं दिलेलं बलिदान सर्वश्रुत आहे. आता आपण शांततेसाठी प्रयत्न करुयात आणि आपल्या जनतेच्या सामाजिक-आर्थिक विकासावर लक्ष केंद्रीत करुयात”, असं शरीफ आपल्या ट्वीटमध्ये म्हणाले आहेत.