
दैनिक चालु वार्ता,
पुणे प्रतिनिधी
शाम पुणेकर
पुणे :- आंतरराष्ट्रीय स्तरावर पुण्याचे नाव नेहमीच अग्रेसर असते. पुनीत बालन समूहाचे अध्यक्ष पुनीत बालन आणि भारतीय क्रिकेट संघातील फलंदाज केदार जाधव यांनी एकत्रितरीत्या ‘पुनीत बालन – केदार जाधव क्रिकेट अॅकॅडमी’ची पुण्यात सुरुवात करत असल्याची घोषणा बुधवारी पत्रकार परिषदेत केली. पुणे शहराला क्रिकेटचा ऐतिहासिक वारसा आहे.
या शहराने अनेक राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय कीर्तीचे खेळाडू निर्माण केले आहेत. पुण्यातील युवा आणि गुणवान खेळाडूंना आपल्या गुणकौशल्याचा विकास करून त्यांना आपली कारकीर्द घडवण्याच्या हेतूने या अॅकॅडमीची सुरुवात करण्यात येत आहे, असे पुनीत बालन आणि केदार जाधव यांनी सांगितले. ही अॅकॅडमी सध्या कोथरूड येथे सुरू आहे.
नामांकित प्रशिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली मुलांना मार्गदर्शन करणे, विविध प्रकारचे प्रशिक्षण देण्यासह युवा खेळाडूंना तंत्रशुद्ध प्रशिक्षक मिळवून देणे, मुलांसोबतच मुलींच्या क्रिकेटलाही प्रोत्साहन देणे, याबरोबरच अंध आणि शारीरिक विकलांग खेळाडूंनाही संधी उपलब्ध करून देणे हे अॅकॅडमीचे उद्देश आहेत.