
दैनिक चालु वार्ता, वृत्तसेवा
अहमदनगर :– राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांनी हिंदू पुरोहितांबद्दल केलेल्या वादग्रस्त वक्तव्यानंतर राज्यात चांगलीच खळबळ उडाली. त्यांच्या वक्तव्याचा विरोधी पक्षासह राज्यभरातून निषेध करण्यात येत असताना राष्ट्रवादीच्या आमदारानेही मिटकरींच्या वक्तव्याचा निषेध केला आहे. ब्राम्हण समाजाच्या वतीने राज्यात ठिकठिकाणी मिटकरींविरोधात आक्रमक आंदोलने केली जात आहेत. राष्ट्रवादीचे अहमदनगर शहरातील आमदार संग्राम जगताप यांनीही या आंदोलनात सहभाग घेत मिटकरींच्या वक्तव्याचा निषेध केला आहे. संग्राम जगताप हे ब्राम्हण समाजाच्या कार्यकर्त्यांसोबत पोलिस ठाण्यात गेले.
यावेळी त्यांनी अमोल मिटकरींसह राष्ट्रवादीचे नेते व सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांच्याविरोधात तक्रार नोंदवत पक्षाला घरचा आहेर दिला आहे. गुन्हा दाखल करण्याची प्रकिया सुरू झाली असून जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांचे नाव मात्र यातून वगळण्यात आले आहे. दरम्यान, राष्ट्रवादीच्या मेळाव्यात मिटकरींनी केलेल्या वक्तव्याचा आम्ही निषेध करतो. आपले मत व्यक्त करताना कोणाच्याही भावना दुखावल्या गेल्या नाही पाहिजे, असं संग्राम जगताप म्हणाले. तर आम्ही याविरोधात आंदोलन करत असून पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे, असेही जगताप यांनी सांगितले.