
दैनिक चालु वार्ता, वृत्तसेवा
समान नागरी कायद्यावरून वाद वाढत चाललाय.असा कोणता कायदा आल्यास राजद संसदेत विरोध करेल, असं विरोधी पक्षनेते तेजस्वी यादव (Tejashwi Yadav) यांनी भाजपला (BJP) सुनावलंय. ते म्हणाले, आरएसएसला देशात संविधानाच्या जागी आपला अजेंडा राबवायचाय. सध्या देशातील सरकार नागपुरातून चालवलं जात आहे. जेव्हा सरकार हा कायदा आणेल, तेव्हा राष्ट्रीय जनता दल (Rashtriya Janata Dal) त्याला विरोध करेल. यासोबतच सीबीएसईच्या अभ्यासक्रमात उर्दू विषयाच्या चॅप्टरबाबत करण्यात आलेल्या बदलांनाही विरोध करणार असल्याचं तेजस्वी यांनी सांगितलंय.
तर, दुसरीकडं आरजेडी कार्यकर्ता रामराज यांच्यासोबत तेजप्रताप यांच्यावर झालेल्या मारहाणीच्या आरोपावर तेजस्वी यादव यांनी याबाबत माहिती घेतली जाईल, असं सांगितलंय. सध्या बिहारमधील राजकारण समान नागरी कायद्यावरून जोरात सुरूय. भाजप ही काळाची गरज असल्याचं म्हणत असताना, जेडीयू संसदीय मंडळाचे अध्यक्ष उपेंद्र कुशवाह यांनी देश संविधानावर चालतो आणि भविष्यातही चालत राहील, असं म्हंटलंय. बिहारमध्ये समान नागरी संहितेची गरज नसताना मग प्रश्न येतोच कुठून? बिहारमध्ये मुख्यमंत्री नितीश कुमार यांचं सरकार आहे आणि त्यांच्या मुख्यमंत्रिपदाच्या कार्यकाळात कोणत्याही किमतीत समान नागरी संहिता लागू करण्याचा प्रश्नच उद्भवत नाही, असं त्यांनी स्पष्ट केलंय.