
दैनिक चालु वार्ता, वृत्तसेवा
शिर्डी :- या वर्षी कमी पर्जन्यमान झाला आहे. त्यामुळे काही गावांमध्ये पाण्याची कमतरता भासत आहे. येणाऱ्या एक-दीड महिन्याच्या कालावधीत पाण्याची मागणी वाढणार आहे. त्यामुळे ज्या गावांची मागणी असेल त्या ठिकाणी अधिकारी पाठवून माहिती घेऊन तातडीने पिण्याच्या पाण्याचे टँकर उपलब्ध करून द्यावे असे निर्देश सूचना महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी प्रशासनाला दिल्या आहेत.
संगमनेर उपविभागीय कार्यालय येथे झालेल्या टंचाई आढावा बैठकीत ते बोलत होते. यावेळी बोलताना मंत्री थोरात म्हणाले की, काही वर्षांपूर्वी शंभर टँकरची मागणी या तालुक्यात होत होती. अशा कठीण परिस्थितीतून अत्यंत चांगल्या पद्धतीने प्रशासनाने दुष्काळी परिस्थिती हाताळली.यावर्षी कमी पाऊस झाल्याने काही गावांमध्ये पाण्याची टंचाई निर्माण होऊ शकते. त्यामुळे ज्या ठिकाणी मागणी असेल त्या ठिकाणी तातडीने अधिकारी पाठवून पाण्याचे टँकर उपलब्ध करून द्या.
तसेच ज्या गावांमध्ये रोजगार हमीच्या कामांची मागणी असेल आणि वीस मजूर कामावर येण्यास तयार असेल तेथेही तातडीने रोजगार हमीचे कामे सुरू करा अशा सूचना प्रशासनाला दिल्या. तसेच तालुक्यात तलाव दुरुस्तीसाठी मोठा निधी प्राप्त झाला असून पदाधिकाऱ्यांनी तलाव दुरुस्तीचे कामे चांगली करून घ्या अशी सूचना केली.