दैनिक चालु वार्ता वृत्तसेवा-
दिल्ली : देशातील सर्वांत मोठी तेल कंपनी इंडियन ऑयल ने जारी केलेला आर्थिक अहवाल पाहता, कंपनीने नफ्याचे सर्व विक्रम मोडीत काढले आहेत. जानेवारी ते मार्च या कालावधीत तेल कंपन्यांना प्रती लिटर 9 रुपयांपर्यंत तोटा होत असल्याचे सांगण्यात येत असताना, इंडियन ऑयल या तिमाहीत 6,021.88 कोटी रुपयांचा नफा झाला. या कंपनीचा देशातील पेट्रोलियम बाजारपेठेपैकी निम्मा वाटा आहे.
इंडियन ऑयल ही देशातील सर्वांत मोठी तेल कंपनी आहे. कंपनीच्या आर्थिक अहवालानुसार, 2020-21 मध्ये कंपनीचे एकत्रित उत्पन्न 7.36 लाख कोटी रुपये होते. कोणत्याही कंपनीच्या एकाच आर्थिक वर्षातील कमाईपेक्षा ही रक्कम अधिक आहे, असे कंपनीचे वित्त संचालक संदीप गुप्ता यांनी सांगितले.
या कालावधीत कंपनीने 24,184.10 कोटी रुपयांचा निव्वळ नफा कमावला आहे, जो आजपर्यंतचा विक्रम आहे. मार्चच्या शेवटच्या 10 दिवसांत पेट्रोल आणि डिझेलच्या किमती वाढल्या. इंडियन ऑयलने गेल्या आर्थिक वर्षात निर्यातीसह 864.07 लाख टन उत्पादनांची विक्री केली आहे. 1 जानेवारी ते 21 मार्चपर्यंत पेट्रोल आणि डिझेलचे दर स्थिर होते. मार्चच्या शेवटच्या 10 दिवसांत नऊ दिवस दरात वाढ झाली होती.