दैनिक चालू वार्ता पंढरपूर प्रतिनिधी-सुधीर आंद
पंढरपूर : अवैध वाळू उपसा आणि वाहतूकी विरोधात पंढरपूरच्या महसूल विभागाने धडक मोहिम हाती घेतली असून ,महसूल पथकाने भीमा नदीपात्रातील अहिल्या पुलाखाली अवैध वाळू उपसा व वाहतुकीसाठी वापरण्यात येणाऱ्या ९ होड्यांंची तोडफोड करून त्या जाळून नष्ट करण्यात आल्या असल्याची माहिती तहसीलदार सुशील बेल्हेकर यांनी दिली आहे.
पंढरपूर तालुक्यात वाळू उपसा व वाहतूक करणाऱ्यांच्या विरोधात कारवाई करण्यासाठी महसूल प्रशासनाने प्रांताधिकारी गजानन गुरव यांच्या मार्गदर्शनाखाली तहसीलदार सुशील बेल्हेकर यांनी पथकाची नेमणूक केली आहे. भीमा नदी पात्रातील लाकडी होड्याद्वारे अवैध वाळू उपसा व वाहतूक करण्यात येत असल्याची माहिती पथकास मिळाली.
त्यानुसार महसूल विभागाच्या पथकाने शुक्रवार दिनांक २७ मे २०२२ रोजी सायंकाळी ४.०० ते रात्री ८.०० वाजेपर्यंत भीमा नदी पात्रातील अहिल्या पुलाखालील नऊ होड्या पकडून त्यांची जेसीबीच्या साह्याने तोडफोड करून त्या जाळून पूर्णपणे नष्ट करण्यात आल्या असल्याचे तहसीलदार बेल्हेकर यांनी सांगितले. या पथकात मंडळ अधिकारी विजय शिवशरण ,रवी शिंदे तलाठी राजेंद्र वाघमारे ,प्रशांत शिंदे ,चांडकोठे ,कोतवाल तानाजी लोंढे तसेच भाऊ शिंदे , संजय अभंगराव हे सहभागी होते.