दैनिक चालु वार्ता पुणे प्रतिनिधी -शाम पुणेकर.
पुणे: महापालिका, आमदार,खासदार आणि पीएमपीने शहरभर कोट्यवधींचा खर्च करत स्टेनलेस स्टीलचे बस थांबे उभारले. मात्र, तेथील फायबर शीट आणि लोखंडी जाळ्या चोरांनी लंपास केल्या. त्यामुळे केवळ स्टेनलेस स्टिलचे सांगाडे शिल्लक राहिले आहेत. याच फाटक्या-तुटक्या बस थांब्यांवर सध्या ऊन आणि भविष्यात पावसाचा सामना प्रवाशांना करावा लागणार आहे. त्यामुळे रेल्वेप्रमाणे “विस्टाडोम’ सेवेचा आनंद प्रवाशांना दिला जातोय का? असा उपरोधिक प्रश्न प्रवासी विचारत आहेत.
पीएमपीने प्रत्येक बसथांब्यासाठी सरासरी सात ते दहा लाख रुपये खर्च केला आहे. बसस्थानक बसचे वेळापत्रक नसले, तरी आमदार, खासदार आणि नगरसेवकांची नावे मात्र दिमाखात झळकत आहेत. मात्र, हे सांगाडे दुरुस्त करण्याची तसदी ना पीएमपी घेत आहे ना महापालिका. त्यामुळे प्रवाशांना मात्र केवळ मनस्तापच सहन करावा लागत आहे.केवळ लोखंडी सांगाडे राहिले आहेत.
बसथांब्यांच्या सांगाड्यांचा एक-एक भाग दररोज गायब होत आहे. “विस्टाडोम” म्हणजे पर्यटकांना निसर्ग सौंदर्य पहाण्यासाठी रेल्वेने “विस्टाडोम कोच” उपलब्ध केले आहेत.