
दैनिक चालू वार्ता मुखेड प्रतिनिधी-संघरक्षित गायकवाड
सातारा : न भूतो न भविष्यती…. या प्रमाणे राजेपदाचा उपयोग सर्वसामान्यांच्या उद्धारासाठी करणारा राजा म्हणून राजर्षी शाहू महाराज हे अजरामर ठरले आहेत. त्यांच्या नावाने मार्गही निर्माण करू.असे प्रतिपादन बंधुत्व प्रतिष्ठानचे संस्थापक अनिल वीर यांनी केले.
येथील शाहुनगर येथील शाहु चौकात राजर्षी शाहु महाराज यांची १४७ वी जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.तेव्हा प्रमुख अतिथी म्हणून अनिल वीर मार्गदर्शन करीत होते. अध्यक्षस्थानी ज्येष्ट कार्यकर्ते ज्ञानेश्वर (बापू) कदम होते.
अनिल वीर म्हणाले,शाहुनगरचा महिमा अनेक वर्षांपासून येथील रहिवासी असणाऱ्या बहुजनांत आहे. त्यामुळे छ.शाहु महाराज या नावाबाबत कोणाचाही आक्षेप असण्याचे कारण नाही. दोन वर्षांपूर्वी चौकासही शाहु चौक म्हणुन नामकरण केलेले आहे. आता, “राजर्षी शाहु महाराज मार्ग” असे नामकरण लवकरात लवकर करण्यासाठी प्रशासकीय पूर्तता सर्वानुमते केली जाईल. छ. शाहू महाराज यांनी ऐश-आराम केला नव्हता. सगळी सुखे त्यांच्या पायाशी लोळण घेत असतानाही अत्यंत साधेपणाने राहणारा राजा ठरला. सर्वसामान्य माणसांत मिसळणारा रयतेच्या हातची चटणी-भाकर खाण्यात धन्यता मानणारा मोठ्या मनाचा राजा होता. वेदोक्त प्रकरणाची लढाई लढण्यापासून ते अस्पृश्यता निवारणाचे कार्य केले. शिक्षणाचा प्रसार-प्रचार करण्यापासून ते क्षात्रजगद्गुरु पिठाची निर्मिती करण्यापर्यंत शाहू महाराजांनी क्रांतिकारी निर्णय घेतला.अनेक आघाड्यावर त्यांनी संघर्ष केला.
वंचित विद्वतचे जिल्हाध्यक्ष आदिनाथ बिराजे म्हणाले, १९१७ साली कोल्हापूर संस्थानात प्राथमिक शिक्षण मोफत आणि सक्तीचे करणारा जाहीरनामा काढून सर्वसामान्यांच्या प्रगतीची दारं शाहू राजाने खुली केली. एवढेच नाही तर जे आई-वडील आपल्या मुलाला शाळेत पाठवणार नाही त्यांना महिन्याला एक रुपये दंड ठोठावण्याची शिक्षा शाहू महाराजांनी आपल्या सदर मोफत व सक्तीच्या शिक्षणाच्या आदेशांमध्ये दिली. शाहू महाराज “म्हणायचे माझ्या राज्यातील प्रजा इतकी भोळीभाबडी आहे ना की तिच्यासाठी फक्त शिक्षणाची दारे खुली करून चालणार नाहीत तर मला त्या दाराच्या आत तिला बळजबरीने ढकलावं लागेल. शेतकऱ्यांसाठी भोगावती नदीवर राधानगरी नावाचे धरण बांधून घेऊन कोल्हापूर जिल्ह्याला कायमच सुजलाम-सुफलाम करण्याचं संपूर्ण श्रेय आपणास छत्रपती राजर्षी शाहू महाराजांना द्यावं लागतं. त्यांनी बहुजन समाजासाठी आपल्या प्रशासनातील ५० टक्के रिक्त होणाऱ्या जागा राखीव ठेवण्याचा निर्णय घेतला व मराठ्यांसह सर्व बहुजन समाजातील दीनदुबळ्या जातींना आरक्षणाची तरतूद करून ठेवली.
प्रारंभी,छ.शाहु महाराज यांच्या नामफलकास पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.सदरच्या कार्यक्रमास धम्मबांधव उत्सव कमिटीचे अध्यक्ष शामराव बनसोडे,डॉ.सुभाष जाधव,विलास मस्के,विवेक मस्के,अनिल कांबळे, शाहूनगरचे नागरीक मोठ्या संख्येनी उपस्थित होते.विजय निकम यांनी सूत्रसंचालन व आभारप्रदर्शन केले.