
दैनिक चालु वार्ता वृत्तसेवा-
मुंबई : शिवसेनेत मोठे बंड घडवून आणणारे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गट विरुद्ध उद्धव ठाकरे गट यांच्यात शिवसेनेवरील ताब्यावरून आगामी काळात मोठा संघर्ष होण्याची शक्यता आहे.
शिवसेनेने जिल्ह्याजिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांकडून पक्षनिष्ठेची प्रतिज्ञापत्रे भरून घेण्याचे धोरण आखले आहे. विधानसभेत विश्वासमत सिद्ध केल्यानंतर शिंदे गटाकडूनही शिवसेनेवरील वर्चस्वासाठी तयारी सुरू केली जाणार आहे.
शिवसेना पक्ष, शिवसेनेचे धनुष्यबाण हे निवडणूक चिन्ह आणि मुंबईतील शिवसेना भवनवरील ताब्यावरून शिंदे गट आगामी काळात हालचाली करू शकतो याचा अंदाज आल्याने शिवसेनेने मोर्चेबांधणी सुरू आहे. या अनुषंगाने पुढे न्यायालयात प्रकरण गेले तर जिल्ह्याजिल्ह्यातील शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांचा विश्वास उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वावर असल्याचे सिद्ध करण्यासाठी या हालचाली सुरू असल्याची माहिती आहे. दरम्यान, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बंडखोरी केल्यापासून शिवसेना कुणाची हा प्रश्न उभा ठाकला आहे.