दैनिक चालू वार्ता परभणी प्रतिनिधी- दत्तात्रय वामनराव कराळे
परभणी : आगामी काळात होऊ घातलेल्या निवडणुकीत परभणी जिल्हा परिषदेवर शिवसेना भगवा फडकविल्याशिवाय राहाणार नाही, असा निर्धार परभणी लोकसभा शिवसेनेचे खासदार संजय जाधव यांनी व्यक्त केला आहे. विशेष म्हणजे यावेळी परभणी विधानसभा मतदार संघातील शिवसेनेचे आमदार डॉ. राहूल पाटील यांचीही आवर्जून उपस्थिती होती.
परभणी शिवसेनेचे जिल्हाप्रमुख विशाल कदम, लोकसभा मतदारसंघातील सर्व जिल्हा उपप्रमुख, तालुका प्रमुख, तालुका उपप्रमुख, शहर प्रमुख, शहर उपप्रमुख, सर्व कार्यालये प्रमुख, प्रमुख तथा ज्येष्ठ कार्यकर्ते आदींच्या उपस्थितीत खा. जाधव यांनी आपला हा निर्धार व्यक्त केला.
वसमत रोडवरील खासदार संपर्क कार्यालयात आयोजित या बैठकीत खा. जाधव पुढे असंही म्हणाले की, राज्यात झालेलं सत्तांतर, बदललेली राजकीय समीकरणे आणि परभणी शहर व जिल्हा स्तरावर अभेद्य राहिलेली शिवसेना हेच सर्व कांही समजून घेण्यासारखे आहे. एकजूटीनं असलेले परभणी जिल्ह्यातील सर्व शिवसैनिक यावेळी जि. प. वर भगवा फडकावून नक्कीच आगळा वेगळा इतिहास घडवतील असा विश्वासही खा. जाधव यांनी व्यक्त केला.
यावेळी उभय नेत्यांनी परभणी जिल्ह्याची शिवसेना एकसंघ ठेवण्यात यश तर मिळवलं आहेच शिवाय तेही पक्षाशी एकनिष्ठ राहिले आहेत त्यामुळे सदर दोन्ही नेत्यांचा उपस्थित पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी सन्मान केला.
खासदार व आमदार या दोन्ही नेत्यांनी दिलेलं बळ बघून कार्यकर्त्यांमध्ये कमालीचा आनंद व्यक्त केला गेला. परिणामी उत्साहाचा संचार जिल्हाभरातील शिवसैनिकांमध्ये असाच टिकून राहिल अशा भावना ही अनेकांच्या तोंडून ऐकावयास मिळाल्या. त्यामुळे येणाऱ्या जि.प. व पं स. निवडणूकीत भगवं वादळ एकसंघ राहिलं जाऊन नक्कीच जिल्हास्थानाच्या सत्तेवर भगवा फडकवल्याशिवाय राहाणार नाही किंवा कसे हे येणारा काळच दाखवून देईल.