दैनिक चालु वार्ता वृत्तसेवा-
नवी दिल्ली : पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी शुक्रवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची त्यांच्या दिल्लीतील निवासस्थानी भेट घेतली.
चार दिवसांच्या दिल्ली दौऱ्यावर असलेल्या तृणमूल काँग्रेसच्या प्रमुख ममतांनी त्यांच्या राज्याच्या जीएसटी थकबाकीसारख्या मुद्द्यांवर पंतप्रधानांशी चर्चा केली. ममता यांची पंतप्रधान मोदींसोबत भेट अशा वेळी झाली आहे, जेव्हा ईडीने ममता सरकारमधील मंत्री आणि तृणमूलचे ज्येष्ठ नेते पार्थ चॅटर्जी यांना अटक केली आहे. शिक्षण भरती घोटाळ्यात त्यांना आरोपी करण्यात आले आहे.
ममता बॅनर्जी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची आज भेट घेतली. ममता चार दिवसांच्या दिल्ली दौऱ्यावर आहेत. नवनिर्वाचित राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचीही त्या आज संध्याकाळी भेट घेणार आहेत. ममता बॅनर्जी यांची भेट एका मोठ्या वादाच्या भोवऱ्यात आली आहे कारण ईडीने अलीकडेच ममता सरकारमधील एक दिग्गज मंत्री आणि शिक्षक भरती घोटाळ्यात तृणमूलचे ज्येष्ठ नेते पार्थ चॅटर्जी यांना अटक केली आहे. या घटनेनंतर ममता सरकारने केंद्र सरकारवर एजन्सीच्या अधिकारांचा गैरवापर केल्याचा आरोप केला आहे.
गेल्या वर्षी निती आयोगाच्या गव्हर्निंग कौन्सिलच्या बैठकीत सहभागी न झालेल्या बंगालच्या मुख्यमंत्री ममता यावेळी ७ ऑगस्ट रोजी होणाऱ्या बैठकीला उपस्थित राहण्याची शक्यता आहे. पंतप्रधान मोदी या बैठकीच्या अध्यक्षस्थानी असतील. एक दिवस अगोदर, तृणमूल काँग्रेसच्या अध्यक्षांनी त्यांच्या पक्षाच्या खासदारांची भेट घेतली आणि त्यांच्याशी संसदेचे चालू पावसाळी अधिवेशन आणि २०२४ च्या लोकसभा निवडणुकीच्या पुढील रणनितीवर चर्चा केली.