दैनिक चालू वार्ता जिल्हा उपसंपादक- दत्तात्रय वामनराव कराळे
“””””””””””””””””””””””””””””””””””””””””””
परभणी : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेना गटाचे परभणी जिल्हा संपर्कप्रमुख पदी शिवसेनेचे माजी खासदार ॲड. सुरेश जाधव यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
राज्यात नुकतेच झालेल्या सत्तांतरानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपल्या शिवसेनेची संघटनात्मक बांधणी जोमाने सुरु केली आहे. मुंबईत झालेल्या भेटीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची माजी खासदार ॲड. सुरेश जाधव यांनी भेट घेऊन पक्ष प्रवेश केला होता. त्यावेळी झालेल्या चर्चेच्या अनुषंगाने ही संधी दिली जाणे स्वाभाविक आहे. शिवसेनेतून राष्ट्रवादीत गेलेले ॲड. सुरेश जाधव यांची तेथे घुसमट होत असल्याचे बोलले जात होते. परिणामी त्यांनी हा निर्णय घेतल्याचे समजते.
सिटी पॅलेस हॉटेलात नुकताच घेतलेल्या पत्रकार परिषदेत ही माहिती देण्यात आली. शिंदे गटाच्या मुंबई येथील मध्यवर्ती कार्यालयातील सचिव संजय मोरे यांनी या नियुक्ती संबंधीचे पत्रात ॲड. सुरेश जाधव यांच्यावर जिल्हा संपर्कप्रमुख पदाची तर भास्करराव लंगोटे यांच्यावर सहसंपर्कप्रमुख पदाची जबाबदारी सोपवल्याचे सांगण्यात आले.
एकूणच शिवसेनेतून राष्ट्रवादी व पुन्हा आता शिंदे गटाची शिवसेना असा राजकीय प्रवास केलेले ॲड. जाधव हे शिंदे गटाच्या शिवसेना वाढीसाठी कितपत आणि कसा प्रयत्न करतात हे येणारा काळच दाखवून देईल किंवा नुसतेच पद अडवून राजकीय गटबाजीला प्रोत्साहन देतील हेही दिसणार आहे. आगामी काळात लवकरच महापालिकेच्या निवडणूका होणार आहेत. त्या अनुषंगानेही श्री जाधव व श्री लंगोटे यांना पक्षबांधणी वर जोर द्यावा लागणार आहे. अर्थात त्याचवेळी त्यांचा कस लागला जाईल हे मात्र विसरुन चालणार नाही.