दैनिक चालू वार्ता उपसंपादक परभणी-
परभणी : परभणी विधानसभा मतदारसंघाचे शिवसेना आमदार डॉ. राहूल पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत शहरातील शेकडो मुस्लिम तरुणांनी प्रवेश केला आहे.
माजी नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली सुमारे ४० आमदार फुटले गेल्याने मविआ सरकार कोसळले जाऊन राज्यात सत्तांतर झाले. परिणामी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना मोठ्या प्रमाणात कमजोर झाली अशी चर्चा राज्यात सर्वत्र होत असली तरी परभणी विधानसभा आणि लोकसभा क्षेत्र मात्र त्याला अपवाद आहे, असं म्हटलं तर मुळीच वावगं ठरणार नाही. ज्यांच्या पाठीमागे समर्पक असे पाठबळ नसलेले आणि बोटावर मोजण्या एवढे कांहीजण अन्य पक्षात गेले तरी परभणी जिल्ह्यातली मुळ शिवसेना ही आहे त्याच स्थितीत अद्यापही तटबंदी किल्ल्यासारखीच आहे. जे कोणी अन्यत्र गेले आहेत, त्यांनी यापूर्वी दिले गेलेल्या पदांचा गैरफायदा घेऊन पक्ष संघटनेला बदनाम करण्याचे मनसुबेच रचले होते, अशी चर्चा बोलली जात आहे. तथापि ही बाब लक्षात येताच पक्षप्रमुखांनी त्यांना वेळीच बाहेरचा रस्ता दाखवला असा बोलबाला सर्वश्रुत आहे. त्यांच्या जाण्याने जिल्ह्यातल्या शिवसेनेला काहीच फरक पडला नसून उलटपक्षी मुस्लिम धर्मीय असलेल्या शेकडो तरुणांनी प्रवेश करुन स्थानिक पातळीवरची शिवसेना अधिकच मजबूत केली असल्याचा दावा परभणीत सर्वत्र होणे स्वाभाविक आहे.
कार्यकुशल व कर्मठ स्वभावाचे आमदार म्हणून ज्यांची दुसरी टर्म पूर्णत्वाकडे जात आहे, ती कौतुकास्पद असावी किंबहुना त्यामुळेच मुस्लिम तरुणांनीही आ. पाटील यांच्या समाज कार्यावर आनंदीत होऊन प्रवेश अगदी स्वखुशीने केला असल्याचे चित्र स्पष्ट दिसत आहे. लोकप्रतिनिधी म्हणून कार्यरत असताना धर्मा-धर्मात भेद करण्याऐवजी त्यांना जोडण्याची व समाज कार्याच्या माध्यमातून त्यांची बांधिलकी जोपासण्याचे काम आमदार डॉ. राहूल पाटील हे करीत असावेत म्हणूनच तर मुस्लिम तरुणांचेही शिवसेनेकडे आकर्षण अधिकच वाढले जाणे स्वाभाविक आहे.
आमदार राहूल पाटील यांच्या संपर्क कार्यालयात अल्पसंख्यांक विभागाचे जिल्हाप्रमुख, शहर प्रमुख आणि वरिष्ठ कार्यकर्ते यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली ज्या शेकडो मुस्लिम तरुणांनी प्रवेश केला त्यावेळी आ. पाटील यांनी त्या सर्वांना शिवबंधन बांधले. असंख्य फुलांना एका धाग्यात गुंफून जसा एकोपा साधला जातो तसाच एकोपा मुस्लिम असलात तरी माळेतील फुलांप्रमाणेच शिवसेनेतही कायम ठेवा, जणू असेच मार्गदर्शन आ. पाटील यांनी त्या सर्वांना केले असावे यात संदेह नाही. यावेळी सहसंपर्कप्रमुख डॉ. विवेक नावंदर यांचीही उपस्थिती होती.