दैनिक चालु वार्ता वृत्तसेवा-
देशाची गौरवशाली गुरुशिष्य परंपरा पुढे नेत सक्षम भावी पिढी घडवणाऱ्या समस्त शिक्षकांबद्दल विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी केली कृतज्ञता व्यक्त
मुंबई, दि. ५ :- देशाची गौरवशाली गुरुशिष्य परंपरा पुढे नेत ज्ञानवंत,गुणवंत, चारित्र्यसंपन्न विद्यार्थ्यांच्या पिढ्या घडवणारे शिक्षक हे खऱ्या अर्थाने राष्ट्रनिर्माते आहेत. महात्मा ज्योतीबा फुले, क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले, कर्मवीर भाऊराव पाटील, महर्षी धोंडो केशव कर्वे यांच्यासारख्या असंख्य ध्येयनिष्ठ गुरुजनांनी राज्यात शिक्षणाची बीजे रोवली. शिक्षणाची गंगा सामान्यांच्या दारापर्यंत नेली. राज्यात शैक्षणिक क्रांती घडवून आणली. विद्यार्थ्यांच्या कित्येक पिढ्या घडवल्या. राज्यातील ध्येयनिष्ठ शिक्षकांनी रचलेल्या पायावर आजचा समृद्ध, सुसंस्कृत, समर्थ महाराष्ट्र उभा आहे. राज्यातल्या खेडोपाड्यात आजही असे अनेक ध्येयवादी शिक्षक कार्यरत आहेत. या सर्व गुरुजनांचा महाराष्ट्राला अभिमान आहे, अशा शब्दात विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी शिक्षक बांधवांबद्दल कृतज्ञता व्यक्त करत सर्वाना शिक्षक दिनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.
विरोधी पक्षनेते अजित पवार आपल्या शुभेच्छा संदेशात म्हणतात की,
देशासाठी सक्षम पिढी घडविण्याचे काम शिक्षक करत असतात. या शिक्षक बांधवांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी तसेच त्यांच्या सन्मानार्थ, माजी राष्ट्रपती डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांची जयंती आपण राष्ट्रीय शिक्षक दिन साजरा करतो. राष्ट्रपती डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या कार्याचे स्मरण करुन विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी त्यांनाही अभिवादन केले आहे.