दैनिक चालू वार्ता प्रतिनिधी देगलूर -संतोष मंनधरणे.
देगलूर:गुप्तधनाच्या लालसेपोटी ऐतिहासिक अशा कुष्णूर येथील हेमाडपंथी महादेव मंदिरातील पिंड बाजूला काढून थेट गाभाऱ्यात खोदकाम केल्याचा धक्कादायक प्रकार बुधवारी सकाळी उघडकीस आला. यामुळे गावासह नायगाव तालुक्यात खळबळ उडाली आहे. घटनेची माहिती मिळताच कुंटूर पोलीस घटनास्थळी दाखल होत श्वानपथक व ठसेतज्ञांना पाचारण केले. परंतु चोरट्यांचा काही सुगावा लागला नाही. कुष्णूर येथील औद्योगिक वसाहतीजवळ जवळपास शंभर वर्षापुर्वीचे ऐतिहासिक असे महादेवाचे हेमाडपंथी मंदिर आहे. या मंदिर परिसरात घन असल्याची चर्चा गेल्या अनेक वर्षांपासून या परिसरात होत आहे. त्यामुळे यापुर्वी दोन वेळा मंदिराच्या पाठीमागे मोकळ्या जागेत अज्ञा लोकांनी खोदकाम केले होते. यानंतर मंगळवार दि. ६ सप्टेंबरच्यारात्री अज्ञात लोकांनी गुप्तधनाच्या लालसेवून मंदिराच्या गाभाऱ्यातच खोदकाम करून खळबळ उडवून दिली.
अज्ञात चोरट्यांनी मंदिराच्या गेटचे कुलूप तोडून आत प्रवेश महादेवाची जुनी पिंड बाजूला काढून ठेवली. यानंतर त्याखाली खोदकाम केले. हा प्रकार बुधवार सकाळी आठच्या दरम्यान दर्शनासाठी आलेल्या गावकऱ्यांना दिसून आला. यानंतर गावकऱ्यांनी या प्रकाराची खातरजमा करून ही माहिती कुंटूर पोलीसांना दिली. घटनेची माहिती कळताच स. पो. नि. महादेव पुरी, जमदार कुमरे यांच्यासह पोलीस कर्मचारी मंदिरात पोहचले. पाहणी झाल्यावर श्वान पथक, ठसेतज्ञ टीमला पाचारण करण्यात आले. मात्र श्वानपथकाला चोरट्यांचा माग काढता आला नाही. विशेष म्हणजे ऐतिहासिक हेमाडपंथी मंदिर असल्याने काहीतरी सापडेल याच उद्देशाने थेट मंदिराच्या गाभाऱ्यात उत्खनन करण्यात आले परंतु त्यादरम्यान कुणीतरी आले असावे किंवा येत असल्याची चाहूल लागताच खोदकाम करणाऱ्यांनी कुदळ, फावडे व पाण्याची कॅन जागेवरच सोडून पळ काढला असावा, असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. घटनास्थळी आढळून आलेले हे सर्व साहित्य पोलिसांनी जप्त केले आहे. या धक्कादायक प्रकारामुळे गावासह नायगाव तालुक्यात खळबळ उडाली आहे.
दरम्यान बुधवारी सकाळी गावकऱ्यांनी महादेवाच्या पिंडीची विधिवत पूजा-अर्चा करून पुन्हा मंदिरात स्थापना केली. हे मंदिर ऐतिहासिक असल्याने येथे दर्शन घेण्यासाठी कुष्णूर, वरवडा, सावरखेड आदींसह अनेक गावातील भाविक नेहमी येत असतात. श्रावण महिन्यात भंडारे होतात, असे माजी सरपंच डांग, प्रशांत जाधव यांनी सांगितले. कुंटूर पोलीस ठाण्याचे सपोनि महादेव पुरी व त्यांचे सहकारी दुपारपर्यंतपोलीस ठाण्याचे सपोनि महादेव पुरी व त्यांचे सहकारी दुपारपर्यंत घटनास्थळी तळ ठोकून होते. सदर वृत्त लिहीपर्यंत कुंटूर पोलीस ठाण्यात
गुन्हा दाखल झाला नव्हता.