दैनिक चालु वार्ता वृत्तसेवा-
मुंबई : काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेची नोंद जागतिक पातळीवर घेतली जाईल, असे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी म्हटले आहे.
भारत जोडो यात्रेच्या पार्श्वभूमीवर राज्यात पहिलाच मेळावा कोल्हापूरमध्ये होत आहे. या मेळाव्याला संबोधित करताना बाळासाहेब थोरात यांनी भाजपसह केंद्र सरकारवर टीकास्त्र सोडले.
थोरात म्हणाले की, सोशल मीडियाच्या माध्यमातून यात्रा दाखवण्याचा सतेज पाटील यांनी आयडिया काढली. त्यांना जे सुचते ते वेगळे, हटके असतं. एलईडी व्हॅनच्या माध्यमातून राबवत असलेला हा सुंदर उपक्रम आहे. ते पुढे म्हणाले, लाखोंच्या संख्येने, लहान, वयस्कर माणसे या यात्रेत सहभागी होत आहेत. भाजपने राहुल गांधी यांच्या टी शर्टवर टीका केली, पण देशभरातून टीका करणाऱ्यांवर टीका झाली. त्यांनी यात्रा काढण्यामागचा हेतू पहा असे सुचवले.
काँग्रेसची आतापर्यंत वाटचाल राज्यघटनेनुसार होती, पण 2014 पासून माणूस माणसांपासून दूर नेण्याचा प्रयत्न होत आहे, त्यामुळे ही यात्रा काढून राहुल गांधी पुन्हा माणूस माणसांजवळ आणायचे प्रयत्न करत असल्याचे थोरात म्हणाले.