दैनिक चालू वार्ता उपसंपादक परभणी-दत्तात्रय वामनराव कराळे
“””””””””””””””””””””
परभणी : जिल्ह्यातील कंत्राटी संघटनेचे सार्वजनिक बांधकाम विभागात मागील आठ ते दहा वर्षांपासून असलेल्या थकीत देयापैकी कांही तरी रक्कम दिवाळीपूर्वी देण्यात यावी या मागणीसाठी आज आंदोलन करण्यात आले. त्यानंतरही शासनाने याची दाद न घेतली गेल्यास मात्र थेट मंत्रालयासमोर सामुहिक आत्मदहन केले जाईल असा निर्वाणीचा इशारा देऊन खळबळ उडवून दिली आहे.
सन २०१४ पूर्वीपासून जिल्हाभरातील कंत्राटदारांची रक्कम मोठ्या प्रमाणात देय बाकी आहे. वारंवार मागणी करूनही सार्वजनिक बांधकाम विभागाकडून जाणीवपूर्वक दूर्लक्ष केले जात आहे. दरम्यान मधल्या काळात सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील यांनी प्रत्येक वेळी १५ टक्के रक्कम अग्रक्रमाने दिली जाईल असे आश्वासन दिले होते तथापि त्या आश्वासनाची पूर्ती न करता निव्वळ अपेक्षा भंगच झाला असल्याचा घणाघाती आरोप करीत आता या संघटनेने तीव्र आंदोलनात्मक पवित्रा घेतला आहे.
देय असलेल्या रकमेपोटी कांही रक्कम दिवाळीपूर्वी देण्यात यावी अशी केलेली मागणी अव्हेरली गेल्यास, तिची पूर्ती न झाल्यास किंवा मागणीकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले गेल्यास मात्र थेट मुंबईत जाऊन मंत्रालयासमोर सामुहिक आत्मदहन केले जाईल असा निर्वाणीचा इशाराच या कंत्राटी संघटनेने दिला आहे. एकूणच कंत्राटी संघटनेच्या या इशाऱ्याने संपूर्ण परभणी जिल्ह्यात पूरती खळबळ माजली जाणे स्वाभाविक आहे.