दैनिक चालु वार्ता इंदापूर प्रतिनिधी-बापु बोराटे
इंदापूर बाबा चौक येथील युवा उद्योजक तसेच इंदापूर शहर शिवसेनेचे क्षेत्र प्रमुख सचिन चौगुले यांचा चिरंजीव विश्वजीत सचिन चौगुले ह्या दीड वर्षाच्या चिमुकल्याने तिरुपती बालाजी देवस्थानच अलपिरीमेट्टम ते तिरुपती व्यंकटेशगडा पर्यंत जवळपास तीन हजार पायऱ्या गोविंदा गोविंदा जयघोष करीत पायी सर केल्याने सर्व स्तरातून विश्वजीत चे कौतुक होत आहे.
महाराष्ट्रातील लाखो भाविक दरवर्षी तिरूपती बालाजी दर्शनाला जात असतात. त्यातील अनेक भाविक तिरुपती बालाजीचे दर्शन व्हावे म्हणून, भक्ती भावाने तिरुपती व्यंकटेशगडाच्या पायथ्या पासून जवळपास ३३५० पायऱ्या पायी चढत जावून दर्शन घेतात. यामध्ये इंदापूर येथील चौगुले कुटुंब देखील यंदा दर्शनाला पायी चालत गेल्याने, त्यांच्यासोबत चिमुकला विश्वजीत देखील पायी चालत गेल्याने सर्वांना आनंदाचा धक्काच बसला.
पायी चालत जात असताना इंदापूर तालुक्यातील रोट्रॅक्ट क्लब ऑफ इन्द्रेश्वरचे अध्यक्ष मच्छिंद्र किरकत, अस्मिता किरकत, तसेच सुनीता पवार, सचिन चौगुले, सुनीता चौगुले व रामा पवार शोभाबाई चौगुले यांनीही पायी यात्रा पूर्ण केली. त्यांना जवळपास सहा तासांचा वेळ लागला. साडे तीन हजार पायऱ्यांपैकी तीन हजार पायऱ्या विश्वजीतने पायी चालून पूर्ण केले. यापूर्वीही जगतगुरू संतश्रेष्ठ तुकाराम महाराज पायी पालखी सोहळ्यात विश्वजीतने दहा किलोमीटर चालण्याचा प्रयत्न केला आहे.