दैनिक चालु वार्ता वृत्तसेवा-
आपल्या देशाला देवांचा देश म्हटले जाते. त्याचे मुख्य कारण म्हणजे देशात असलेली मंदिरांची आणि भोळ्या भक्तांची संख्या होय. या संख्येत दिवसेंदिवस वाढच होत आहे. भारत सरकार आजकाल धर्मप्रसार करण्यावर अधिक भर देत आहे.
याचे जिवंत उदाहरण म्हणजे ‘विश्वास स्वरूपम’ ही भगवान शंकरांची सर्वात उंच मूर्ती होय. राजस्थानातील राजसमंद जिल्ह्यात ही शिवाची सर्वात उंच निर्माण करण्यात आली आहे. त्याचे लोकार्पण काल (२९ ऑक्टोबर) करण्यात आले.
राजसमंद जिल्ह्यातील नाथद्वारामध्ये बांधलेल्या या शिवप्रतिमेची उंची 369 फूट आहे. या मूर्तीला जगातील टॉप-5 उंच मूर्तींमध्ये स्थान मिळाले आहे. भगवान शंकरांची ही सर्वात मोठी मूर्ती असून ती ध्यान धारणेत बसलेल्या शंकरांच्या रूपातील आहे. संत कृपा सनातन संस्थेने तयार केलेली ही मूर्ती बनवण्यासाठी 10 वर्षे लागली आहेत.नाथद्वाराच्या गणेश टेकडीवर बांधलेली ही मूर्ती ५१ एकराच्या डोंगरावर पसरलेली आहे. ही मूर्ती एवढी मजबूत आहे की, तासी 250 कि.मी वारे सुटले तरी या मूर्तीला धक्का लागणार नाही.
ही मूर्ती अत्याधुनिक सुविधांनी सुसज्ज आहे. यामध्ये लिफ्ट, जिने आणि हॉलची सुविधा आहे. मूर्तीच्या टॉपला जाण्यासाठी चार लिफ्ट आणि तीन जिने आहेत. पुतळ्याच्या बांधकामात 3000 टन स्टील, लोखंड, 2.5 लाख टन काँक्रीट आणि वाळू वापरण्यात आली आहे
या मूर्तीच्या आत एकावेळी 10 हजार पर्यटक जाऊ शकतात. असे सांगितले जात आहे. ही मूर्ती पाहण्यासाठी तूम्हाला 4 तासांचा कालावधी लागू शकतो. यामध्ये लहान मुलांसाठी गेमिंग झोन, म्युझिकल कारंजे, बंजी जंपिंग, खाद्यपदार्थांसाठी फूड कोर्ट, फोटो शौकिनांसाठी सेल्फी पॉइंट्स बनवण्यात आले आहेत.
विश्वास स्वरूपम्’ला कसे पोहोचावे
मुलांच्या दिवाळी सुट्टी अजूनही सुरू आहेत. त्यामुळे लगेचच प्लॅन करणार असाल तर ‘विश्वास स्वरूपम्’ बेस्ट ऑप्शन आहे. येथे पोहोचण्यासाठी जवळचे विमानतळ हे जेके विमानतळ राजसमंद असून जवळचे रेल्वे स्टेशन नाथद्वारा हे आहे.