दैनिक चालू वार्ता वृत्तसेवा-
मुंबई : प्रभास, सैफ अली खान आणि क्रिती सेनन अभिनित आदिपुरुष या चित्रपटाची त्याच्या घोषणेपासूनच चर्चा सुरू होती. पण, या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाल्यानंतर प्रेक्षक निराश झाले.
त्यानंतर या चित्रपटाच्या चित्रीकरणावरून वादही सुरू झाले. आता या चित्रपटाचं प्रदर्शन लांबण्याची शक्यता आहे.
ओम राऊत दिग्दर्शित हा चित्रपट येत्या मकर संक्रांतिच्या आधी 12 जानेवारी 2023 रोजी प्रदर्शित होणार होता. पण, आता निर्मात्यांनी चित्रपटाचं प्रदर्शन पुढे ढकलण्याचा निर्णय घेतल्याची चर्चा आहे. रामायणावर आधारित या चित्रपटातील ग्राफिक्स आणि व्हिएफएक्स र प्रचंड टीका होत होती. ते ग्राफिक्स दुरुस्त करण्यासाठी हा निर्णय घेतल्याचं बोललं जात आहे.
दुसरीकडे, हाही दावा करण्यात आला आहे की, आदिपुरुषचा बॉक्स ऑफिसवर क्लॅश होणार आहे. कारण, आदिपुरुषच्या निर्मात्यांना पूर्ण खात्री आहे की हा चित्रपट तेलुगू आणि तमिळ भाषिक राज्यांमध्ये चांगली कमाई करेल. पण, त्याच दिवशी आदिपुरुषसह चिरंजीवी यांचा वाल्टेअर वेरैय्या आणि नंदकुमारी बालाकृष्णन यांचा वीर सिम्हा हे दोन चित्रपट प्रदर्शित होत आहेत.
तर दुसरीकडे तमिळ चित्रपटसृष्टीतील सुपरस्टार थलपती विजय यांचा वारिसु आणि थाला अजित यांचा थनिवु हे दोन्ही चित्रपटही याच दरम्यान प्रदर्शित होत आहेत. त्याखेरीज अखिल अक्किनेनी यांचा एजेंट देखील त्याच आठवड्यात प्रदर्शित होत आहे. त्यामुळे आदिपुरुषच्या प्रदर्शनाची तारीख पुढे ढकलण्याचा निर्णय घेतल्याचं बोललं जात आहे. अर्थात अद्याप निर्मात्यांकडून अधिकृत घोषणा झालेली नाही.