दैनिक चालू वार्ता उस्माननगर प्रतिनिधी -लक्ष्मण कांबळे
उस्माननगर ;- राज्यात सामाजिक न्याय विभागाच्या वतीने ‘संविधान दिन’ २६ नोव्हेंबर ते भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण दिन ६ डिसेंबर २०२२ या कालावधीत ‘समता पर्व’ साजरे केले जाणार आहे. यानिमित्ताने विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
संविधान दिन २६ नोव्हेंबर पासून ‘समता पर्व’ उपक्रमास प्रभातफेरी व संविधान वाचनाने सुरूवात होणार आहे. २७ नोव्हेंबर रोजी जिल्ह्यातील प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक शाळा व महाविदयालये, सर्व शासकीय वसतिगृहे, निवासी शाळा, समाजकार्य महाविद्यालय, दिव्यांग शाळा, अनुदानित वसतिगृहे, शाहु- फुले- आंबेडकर निवासी-अनिवासी आश्रमशाळा, केंद्रीय आश्रमशाळांमध्ये निबंध स्पर्धा, प्रश्न मंजुषा, लेखी परीक्षा, वकृत्व स्पर्धा व इतर कार्यक्रम होणार आहेत. २८ नोव्हेंबर रोजी ‘संविधाना’वर व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले आहे. २९ नोव्हेंबर रोजी पत्रकारांसाठी कार्यशाळा घेण्यात येणार आहे. ३० नोव्हेंबर रोजी ‘संविधान’ या विषयावर भिंतीपत्रक, पोस्टर्स, बॅनर इ. बाबत चित्रकला स्पर्धा व अनुसूचित जाती घटकासाठी कार्य करणारे समाजसेवी कार्यकर्ते, प्रतिनिधी, कर्मचारी यांची ‘अनुसूचित जाती उत्थान : दशा आणि दिशा’ या विषयावर कार्यशाळा घेतली जाणार आहे. १ डिसेंबर रोजी युवा गटाची कार्यशाळा, २ डिसेंबर रोजी अनूसुचित जाती व नवबौध्द घटकांच्या वस्तींना भेटी, ३ डिसेंबर रोजी जात प्रमाणपत्र पडताळणी शिबिर, ४ डिसेंबर रोजी ज्येष्ठ नागरिक, दिव्यांग, तृतीयपंथीय यांच्यासाठी कार्यशाळा, ५ डिसेंबर रोजी ‘ संविधान’ विषयावर सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
समता पर्वाचा समारोप भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण दि.६ डिसेंबर रोजी सामाजिक न्याय विभागाच्या लाभार्थ्यांना विविध लाभांचे वाटप, बक्षिस वितरणाने होणार आहे.
राज्यात प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी दि २६ रोजी समता पर्वाच्या कार्यक्रमास त्याच्या जिल्ह्याचे सन्माननीय पालकमंत्री, सन्माननीय स्थानिक लोकप्रतिनिधी, मा.विभागीय आयुक्त,मा.जिल्हाधिकारी,मा. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी, महानगरपालिकांचे मा.आयुक्त, मा.प्रादेशिक उपायुक्त समाज कल्याण विभाग यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित राहणार आहेत. राज्यभरात समता पर्वाच्या माध्यमातून संविधानाचा जागर करण्यात येत असल्याची माहिती समाज कल्याण विभागाचे मा.सचिव सुमंत भांगे व आयुक्त डॉ. प्रशांत नारनवरे यांनी दिली आहे