दैनिक चालू वार्ता उपसंपादक परभणी- दत्तात्रय वामनराव कराळे
परभणी/पूर्णा : शहरापासून सुमारे पाच किलोमीटर अंतरावरील गौर येथील शिवारात झालेल्या खून प्रकरणातील एका आरोपीच्या पोलिसांनी मुसक्या आवळल्या आहेत तर दुसरा आरोपी अद्याप फरार आहे. दरम्यान त्याचाही कसून शोध घेतला जात असल्याची माहिती पोलीस सूत्रांनी दिल्याचे समजते. आर्थिक देवाणघेवाण व्यवहारातून झालेली ही हत्या धारदार शस्त्राने वार करुन केल्याचे मृतांच्या मुलाने दिलेल्या जबानीतून स्पष्ट झाले.
या खूनातील आरोपींचा शोध घेण्यासाठी दोन पथकाची स्थापना करुन केलेल्या तपासणीत एकाच्या मुसक्या आवळण्यात प्रथम दर्शनी यश आल्याची माहिती पोलीस अधिकारी शिवप्रकाश मुळे यांनी दिली असून फरार दुसऱ्या आरोपीला सुध्दा लवकरच ताब्यात घेऊ असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
सदर मयताच्या फॉरेन्सिक तपासणीसाठी व आरोपींचा माग अवगत करण्यासाठी सर्व यंत्रणा घटनास्थळी पाचारण केल्या होत्या. एवढेंच नाही तर शवविच्छेदनही जागेवरच करण्यात आले. या खूनाच्या घटनेमुळे सर्वत्र प्रचंड खळबळ माजली होती तथापि आरोपीच्या शोधामुळे दिलासादायक वातावरण दिसून आले.