दैनिक चालु वार्ता जव्हार प्रतिनिधी-दिपक काकरा.
पालघर/जव्हार: ग्रामीण आदिवासी भागांमध्ये रोजगार,शिक्षण,शेती,शहरात येणे-जाणे या गोष्टी पूर्ण होताना शरीराकडे चांगलेच दुर्लक्ष होत आहे.त्यातच अनियमित सवईने मायग्रेनचा त्रास वाढला असून नागरिकांनी या कडे लक्ष देण्याची आवश्यकता निर्माण झाली आहे.मायग्रेन हा ठणकावणारा आजार आहे.जो कधी डोक्याच्या एका बाजूला किंवा दोन्ही बाजूंना जाणवतो.मायग्रेनचा झटका आल्यावर समोरचे न दिसणे,मळमळणे,ओकारी येणे,प्रकाश,आवाज, वास,स्पर्श सहन न होणे,चेहऱ्याला झिणझिण्या आल्यासारखे वाटणे अशीही लक्षणे दिसू शकतात.त्यामुळे वेळीच लक्ष देणे आवश्यक आहे.
विशेष म्हणजे सध्या वाढती स्पर्धा,परीक्षेचा ताण,खाद्यपदार्थ,स्मार्टफोन,टीव्ही जास्त वेळ बघणे अशा विविध कारणांमुळे मायग्रेनचे प्रमाण वाढले आहे.मायग्रेन म्हणजे डोकेदुखी असे अनेकजण समजतात.पण त्यापलीकडे जाणारा हा आजार आहे.सामान्य डोकेदुखी म्हणून याकडे अनेकजण दुर्लक्ष करतात आणि खाजगी मेडिकल मधून औषधे घेऊन शरीरावर प्रयोग करतात व तात्पुरता दिलासा मिळवतात.पण मायग्रेन हा निव्वळ डोकेदुखीच्या पलीकडे जाणारा आजार आहे.त्यामुळे प्रत्येकाने वेळीच काळजी घेणे गरजेचे आहे.
मायग्रेन
मायग्रेन साधारण डोकेदुखी नाही.त्या व्यक्तीच्या डोक्याचा एक भाग किंवा दोन्ही भागात अतिशय डोकेदुखीचा त्रास होतो.
मायग्रेनची कारणे
डोक्याला अधिक ताण आला असेल तर मेंदूच्या रक्तवाहिन्यांमध्ये अडथळे आल्याने मायग्रेन होतो.जो खाण्याच्या सवयी,वातावरणातील बदल,तणाव,निद्रानाश किंवा जास्त झोपेशी संबंधित असू शकतो.
काळजी कशी घ्यावी.?
संतुलित आहार
संतुलित आहार घ्या,आहारात ताजी फळे,भाज्या आणि योग्य अन्नपदार्थ यांचा समावेश करा,ताजी फळे,गाजर,कलिंगड, बदाम,सुका मेवा,पिस्ताचा आहारात समावेश करा.
पुरेशी झोप
पुरेशी झोप घ्या शरीराला पुरेशी झोप महत्त्वाची आहे.यामुळे शरीर दुसऱ्या दिवसासाठी तयार करत असते.तणाव असेल तर पुरेशी झोप येत नाही.त्याचा परिणाम डोकेदुखीवर होतो.
व्यायाम
किमान दररोज ३० मिनिटे व्यायाम करावा.चालणे यासारखे प्रकार शारीरिक व्यायामात करणे आवश्यक आहे.त्याकडे अधिक लक्ष द्या.
मायग्रेन हा आजार विशेषतः आहार-विहारातील असंतुलितपणा,जीवनशैलीमध्ये बदल,पुरेशी झोप न घेणे,मोबाइल,टीव्ही तासनतास बघणे एकूणच डोक्याला अतिरिक्त ताण दिल्यामुळे मायग्रेनची समस्या उद्भवते.अशा समस्या उद्भवल्यास डॉक्टरांचा सल्ला घेवून उपचार करावा.
डॉ.रामदास माराड,वैद्यकीय अधिक्षक,पतंगशाह, उपजिल्हा रुग्णालय,जव्हार