दैनिक चालु वार्ता वृत्तसेवा
०५ फेब्रुवारी २०२३
स्थळ श्रीमंत पेशवे मंदिर – श्रीवर्धन
म्हसळा / रायगड श्रीवर्धन शहर साउंड मंडप असोशिएशन तर्फे आयोजित सुप्रसिद्ध राष्ट्रीय पुरस्कार विजेते निसर्गोपचार तज्ञ सन्माननीय श्री स्वागतजी तोडकर यांच्या निरोगी आरोग्याबद्दल सखोल मार्गदर्शनाचा लाभ घेणार्या उपस्थित सर्वांचे मनस्वी स्वागत करतो.
नारळ, पोफळी, सुपारी, केळी यांनी संपन्न समृद्ध असलेले गांव म्हणजे श्रीवर्धन, तांबडीच्या डोंगरावरून विहंगम निसर्ग सौंदर्य डोळे भरून पहात रहावं असा गांव म्हणजे श्रीवर्धन, समुद्राची गाज ऐकत शांत आनंदमय जीवन जगावं असा गांव म्हणजे श्रीवर्धन, कलेचा वारसा कले कलेने जपणारं गांव म्हणजे श्रीवर्धन, अनेक पौराणिक कथा लाभलेले अनेक मंदिरांचे गांव म्हणजे श्रीवर्धन, पौर्णिमेच्या चांदण्यांत वाळूवर रेघोट्या माराव्यात असे गांव म्हणजे श्रीवर्धन, ताज्या तडफडीत माशांच्या मांदियळीचं गांव म्हणजे श्रीवर्धन, श्रीमंत बाळाजी विश्वनाथ पेशवे यांचा जन्म झाला अन त्यांच्या पदस्पर्शाने पुनीत झालेला गांव म्हणजे श्रीवर्धन, अशा या श्रीवर्धनमधे *सुनील चिटणीस* साऊंड मंडप असोसिएशनच्या वतीने सन्माननीय निसर्गोपचार तज्ञ श्री स्वागतजी तोडकर, त्यांच्या सुविज्ञ पत्नी सौ संजीवनी तोडकर, तसेच त्यांचे सोबत आलेले सचिव विनायकराव व इतर सहकारी यांचे श्रीवर्धनमधे मनःपुर्वक स्वागत करतो . सर्व पत्रकार बंधुंचे स्वागत, श्रीवर्धनमधील निरोगी आयुष्या बद्दल जागरूक असणाऱ्या तमाम श्रीवर्धनकर प्रेमींचे दिलो जानसे स्वागत. नजर चुकीने कुणी उल्लेख करायचे राहिले असतील त्यांचेही स्वागत.
भगवान धन्वतरींना आयुर्वेदाचे जनक मानले जाते, ज्यांनी मागील हजारो वर्षे आयुर्वेदाचा वारसा चालवला आहे, अशा मान्यवरांना धन्वंतरी संबोधण्यात येते. कालचक्राच्या विभिन्न कालखंडत सुश्रुत – चरक – चाणक्य असे तीन धन्वंतरी होऊन गेले आहेत. तुम्हाला माहीत आहे का? आजही धन्वंतरीची विज्ञानाची देवता म्हणुन पूजा अर्चा करतात. सध्याच्या युगात कै. बालाजी तांबे यांची संस्था, रामदेवबाबा, सातार्यात कार्यशील असलेली आयुर्वेद रसशाळा आयुर्वेदासाठी अखंड कार्यरत असतात. आता तर शैक्षणिक विषयामध्ये B A M S आयुर्वेदिक डॉक्टरकीचे रितसर शिक्षण दिल जाते, श्रीवर्धनकरवासिय खरंच भाग्यवान आहेत कारण साउंड मंडप असोशिएशनच्या पदाधिकाऱ्यांना मनापासून वाटलं की समाजाचं ऋण आपल्यावर आहे अन त्या समाजाचे आपण काही देणं लागतो, या उदात्त भावनेतून निसर्गोपचार तज्ञ श्री तोडणकर साहेब यांना श्रीवर्धन येथे पाचारण करून त्यांचे अनमोल मौलिक विचार सादर करणेसाठी त्यांच्या व्याख्यानाचे आयेजन केले आहे. खरं तर ही आपणां सर्वांसाठी एक सुर्वणसंधीच आहे. मी तर चक्क खेड – रत्नागिरीवरून खास या कार्यक्रमाला आलो आहे. तुम्हांला सांगतो माझे आजोबा कै. विनायक भिकाजी उर्फ भाईसाहेब चिटणीस हे निष्णात वैद्य होते अन त्याचा मला अभिमानही आहे. खरंच मी भाग्यवान आहे आज मला तोडकर साहेबांचे व्याख्यान ऐकायला मिळणार आहे.
श्रीवर्धन आणि आयुर्वेद याबाबत बोलायचं झाल तर मी सांगेन श्रीवर्धनमधे बऱ्याच वर्षांपासून कै. विनायकजी वैद्य पेशवे आळीमधे वडिलोपार्जित आयुर्वेदिक व्यवसाय करत होते, साऱ्या पंचक्रोशितून अनेक रुग्ण त्यांचेकडे येत होते व तंदुरूस्त होऊन परत जात होते, हे सत्य आहे, श्रीवर्धन ते सायगांव दहा किलोमिटर पायी चालत जाऊन रुग्णांना सेवा अर्पण करीत होते. तेव्हा फी किती होती केवळ चार आणे म्हणजेच पंचवीस पैसे जे सध्याच्या चलनातून केव्हाच बाद झाले आहेत.
सध्याच्या युगात BAMS आयुर्वेदिक डॉकटर म्हणून डॉ. ललीत मेहता,डॉ. श्री व सौ. मुकेश श्रीवर्धनकर,डॉ. ऋशिकेष रुद्रवार हे आयुर्वेदिक डॉक्टर म्हणुन व्यवसाय करत आहेत. अन्यही काही असतील परंतु मला ज्ञात नाहीत. आयुर्वेदिक वनस्पतींचे जाणकार म्हणुन श्रीवर्धनमधील कै. वसंतराव वैद्य ( कोपरी जवळ ) तसेच त्यांचे सुपुत्र विनय वैद्य, सध्या ते गुणकारी आवळा सरबत व इतर तत्सम आयुर्वेदिक उत्पादने तयार करून त्यांच्या वडिलांचा वारसा पुढे चालवीत आहेत. तसेच वनस्पती जाणकार अभ्यासक श्री महेश शिवराम वैद्य पेशवे मंदिर समोर हे ही एक अभ्यासक आहेत व ते माझे मित्रही आहेत, असो. !!!!
®️ सुनील शरद चिटणीस
श्रीवर्धन – रायगड