दैनिक चालु वार्ता देगलूर प्रतिनिधी -संतोष मनधरणे
भारत राष्ट्र समितीच्या सभेला मनसेचा विरोध
देगलूर/प्रतिनिधी : तेलंगणाचे मुख्यमंत्री के.चंद्रशेखर राव यांनी राष्ट्रीय राजकारणात प्रवेश करण्याहेतूने त्यांच्या तेलंगणा राष्ट्र समितीचे नाव बदलून भारत राष्ट्र समिती असे करून महाराष्ट्रातील नांदेड येथे त्यांची पहिली जाहीर सभा दि. ५ रोजी आयोजित करण्यात आली होती. त्या सभेला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जिल्हाध्यक्ष माँटीसिंघ जहागीरदार यांनी आपला विरोध दर्शविला. मनसेने के. चंद्रशेखर राव यांनी अगोदर प्रलंबित बाभळी बंधारा प्रश्न सोडवावा मगच महाराष्ट्रात पाय ठेवावा अशी भूमिका घेतली. त्यामुळे नांदेड येथे सभेला विरोध करण्यासाठी निघालेल्या देगलूर येथील मनसे कार्यकर्त्यांना देगलूर पोलिसांनी ताब्यात घेतले.
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जिल्हा सचिव प्रवीण मंगनाळे यांच्यासोबत असलेल्या कार्यकर्त्यांना रात्रीच नोटीस देऊन सकाळी लवकर ताब्यात घेण्यात आले. यात एकनाथ टेकाळे, विश्र्वांबर कंतेवार, चंदू अक्यमवार, बालाजी याटावार, यादव उनग्रतवार, शेख चाँद देगावकर, धनंजय टेकले यांच्यासह अनेक मनसे कार्यकर्त्यांना ताब्यात घेऊन नंतर सोडण्यात आले.