दैनिक चालु वार्ता मुखेड प्रतिनिधी-शिवकुमार बिरादार
मुखेड तालुक्यातील येवती येथील श्री सद्गुरू नराशाम महाराज पब्लिक स्कूलच्या वतीने ११ फेब्रुवारी रोजी ठेवण्यात आलेल्या सांस्कृतिक कार्यक्रमाला विविध मान्यवरांना निमंत्रित करून त्यांचा यथोचित सन्मान करण्यात आला असून या सांस्कृतिक कार्यक्रमाची सुरुवात प्रथम गणेश वंदना गीताने करण्यात आली आहे.
येवती येथील पब्लिक स्कूल शाळेचे संचालक आनंदराव राठोड सर यांच्या नियोजनातुन पार पडलेल्या सांस्कृतिक कार्यक्रमात याच शाळेतील चिमुकल्या बाल कलाकारांनी विविध सामाजिक लोकजागृती ,व देशभक्तीपर सुंदर अश्या विविध गीतांवर नृत्य सादर करून आपल्या अंगात असलेली कला प्रेक्षकांच्या समोर मांडली आहे. चिमुकल्यांनी सादर केलेल्या विविध गीतावर खुश होऊन अनेकांनी अक्षरशः बक्षीसांचा वर्षाव केला होता. लहान मुलाचा सांस्कृतिक कार्यक्रम पाहण्यासाठी गावातील व आजूबाजूतील पालकांनी मोठी गर्दी केली असून अक्षरशः शाळेचा वरांडा भरगच्च तुडुंब असा भरलेला होता. जवळजवळ चार हजार प्रेक्षकांनी या कार्यक्रमांचा आस्वाद घेतला आहे. तर दुसरीकडे मात्र स्वतःच्या मुलांचे सुंदर असे नृत्य पाहून अक्षरशः पालक वर्ग भारावून भावनिक झाला होता.
या सांस्कृतिक कार्यक्रमात अनेक विविध गीते सादर केली असून त्यात प्रथम गणेश वंदना गीत , शेतकरी आत्महत्या पर गीत, मराठमोळ गाणं आमचं लाख मोलाच सोन, चंद्रा लावणी, कोळीगीत, झुमका वाली पोर , झिंग झिंग झिंगाट, असे एकाहून एक चड गीते सादर करण्यात आली . मध्यंतरी सादर केलेल्या देशभक्तीपर गीतावर खुश होऊन उपस्थित प्रेक्षकांनी टाळ्यांच्या कडकडाटाने त्याचे स्वागत केले असून काही काळ शाळेचा ग्राउंड टाळ्याच्या कडकडाटाने दणाणून गेला होता. लहान मुलात किती कला गुण लपलेले आहेत याचे प्रत्यक्ष दर्शन या सांस्कृतिक कार्यक्रमातून पालकांना व प्रेक्षकांना दिसून आले आहे. लहान मुलांचा सांस्कृतिक कार्यक्रम पाहण्यासाठी आजूबाजूतील दहा ते बारा गावचे पालक वर्ग व गावातील मान्यवर मंडळी , तरुण व महिला भगिनी मोठ्या प्रमाणावर उपस्थित होते .श्री सद्गुरू नराशाम महाराज पब्लिक स्कूल मध्ये अतिशय नियोजनबद्ध सुंदर असा संस्कृतिक कार्यक्रम आयोजित केल्याबद्दल शाळेचे संचालक आनंदराव भानुदास राठोड सर, मुख्याध्यापिका एम.एम. हिवराळे, जी. एन. देवकते , एस.डी. जाधव, पी. ए. राठोड मॅडम, एस. एस. आटके मॅडम, बी.बी. गायकवाड मॅडम, ए.जे. गोपनर , टी.एम. नागरगोजे, आधी शिक्षकांचे प्रेक्षक ,पालक, व गावकऱ्यांच्या वतीने सर्व स्तरातून मोठे कौतुक करण्यात येत आहे.