
दै चालु वार्ता अक्ककुवा प्रतिनिधि आपसिंग पाडवी
मोलगी: सातपुड्यात मोलगी ही एक महत्वाची बाजारपेठ असून तेथे संपूर्ण पहाडातून येणाऱ्या नागरिकांची मोठी वर्दळ असते. तेथील प्रत्येक दुकानदार/व्यापाऱ्यांकडे ग्राहकांची झुंबड उडते. त्यापैकीच एका व्यापाऱ्याने ग्राहकांकडून त्याला मिळालेल्या प्रतिसादाच्या जोरावर चांगला विकास साधला, परंतु हा व्यापारी तेवढ्यावर समाधानी नसून त्याने थेट जागा, मुख्य रस्ता व वीज पुरवठा सुरू असलेल्या पोलवर अतिक्रमणही सुरू केले असल्याची तक्रार ॲड. सरदारसिंग वसावे यांनी अक्कलकुवा तहसीलदारांकडे केली आहे.
मोलगीचा मुख्य रस्ता व बाजारपेठेच्या मध्यवर्ती भागात असून हा प्रकार सुरू असून पुढे काही पटीने वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे ग्राहक, सर्वसामान्य नागरिक, वाहनधारकांना याचा धोका निर्माण झाला असल्याचे तक्रारीत नमूद केले आहे. जिवीतहानी टाळण्यासाठी मोलगीत सुरक्षा व सुव्यवस्थेची नितांत आवश्यकता आहे. परंतु एका व्यापाऱ्याचा हा प्रताप व स्वार्थी प्रवृत्तीने केवळ त्याच्यापुरताच धोक्याचा नसून दिवसाकाठी त्याच्याकडे येणाऱ्या शेकडो ग्राहकांच्या जिवालाही धोका निर्माण केले असेही तक्रारीत म्हटले आहे.
मोलगीतील सुरक्षेसाठी संबंधीत जागेचा मालकी हक्क, बांधकामाची परवानगी, चालू वीज पुरवठ्याच्या पोलवरील हक्क, गटार व रस्त्यावरील अतिक्रमण याची तातडीने सखोल चौकशी करावी व कुठल्याही अनर्थाची वाट न पाहता धडक कारवाई करावी अशी मागणी ॲड. सरदारसिंग वसावे यांनी तक्रारीद्वारे केली आहे. अन्यथा तिव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा ही दिला आहे.
◾तक्रारीतील प्रमुख मुद्दे-
१) जमिनीवरील बांधकाम हे मुख्य रस्त्याच्या गटारीला लागूनच केले असल्याने गटारीवरही त्याने केले मालकीहक्क प्रस्थापित.
२) वरचा माळा हा गटारीवर येतो अर्थात या माळ्याचे बांधकाम गटार दाबूनच करीत त्याने निर्माण केला उंच वाहतुकीसाठी धोका.
३) रस्त्यावर येतो म्हणून हलविण्यात आलेल्या विद्युत पोलला (चालू वीज पुरवठा) वळसा घालून उभारली इमारत (इमारतीत पोल).
४) याच इमारतीत त्याचा व्यवसाय सुरू असून त्याने मांडलाय ग्राहकांच्या जिवाशी खेळ.
५) पोलवरील उघड्या विजतारा व इमारत यांच्यातील अंतर केवळ चार ते पाच फुटाचेच आहे. यातून व्यापाऱ्याने निर्माण केले शॉर्टसर्किटसारखे जिवीतहानीचे धोके.
◾ग्रामपंचायत व वीज वितरणवरही ठपका-
वरील दोन्ही प्रकारच्या अतिक्रमणासाठी वीज वितरण व ग्रामपंचायतीने पाठिंबा/परवानगी दिल्याचे स्पष्ट होते. दोन्ही यंत्रणेने पाठिंबा/परवानगी दिली नसेल तर दोन माळ्याची इमारत उभी राहते, सार्वजनिक विद्युत पोलाच्या चोहो बाजूने बांधकाम होते व उघड्या विजतारेेजवळून बांधकाम होते तोपर्यंत दोन्ही यंत्रणा निद्रेत असावे हे मात्र निश्चित आहे, असे म्हणत दोन्ही यंत्रणेवरही आरोप केले आहे.
◾प्रतिक्रिया-
मोलगीत अनेक बेकायदेशीर बाबी उद्भ़वत आहे, याविरुद्ध तक्रारी करुनही प्रशासन दखल घेत नाही. काही बाबी निदर्शनास आणून दिल्या तरीही ठोस कारवाई केली जात नाही, म्हणूनच मोलगी याचे पेव फुटत आहे. खरं तर कुठल्याही अतिक्रमणामुळे एखाद्या घटकांवर अन्यायच होतो, परंतु या अतिक्रमणामुळे अन्यायासह शेकडो ग्राहकांच्या जिवाला धोकाही निर्माण झाला आहे. म्हणूनच हा प्रकार दुहेरी अडचणी निर्माण करणारा ठरत आहे.
– ॲड. सरदारसिंग वसावे, कार्याध्यक्ष, सातपुडा आदिवासी युवक मित्र मंडळ, मोलगी