
दैनिक चालु वार्ता मुखेड प्रतिनिधी – शिवकुमार बिरादार
मुखेड :-
शहरातील महात्मा ज्योतिबा फुले महाविद्यालयाच्या महिला सशक्तीकरण विभागाच्या वतीने ” नारी सुरक्षा कवच अभियान ” राबविण्यासाठी सँनिटरी नँपकिन व डिस्पोजल मशिन बसविण्यात आले . महिलांच्या प्रत्येक मासिक पाळीच्या वेळी योग्य खबरदारी घेतल्यास भविष्यातील जिवघेण्या आजारापासून होणाऱ्या त्रासापासून वाचता येते असे डॉ. रचिता कौरवार यांनी प्रतिपादित केले .
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ . शिवानंद अडकिणे , उद्घाटक जेष्ठ साहित्यिक सौ.कुसुम चांडोळकर , प्रमुख मार्गदर्शिका मातोश्री हाँस्पीटलच्या डॉ. रचिता कौरवार , व्यासपीठावर उपप्राचार्य प्रा.एस.बी.बळवंते , महिला सशक्तीकरण कक्षाचे प्रमुख प्रा.डॉ. आशा गित्ते हे उपस्थित होते . कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा.डॉ. मनिषा देशपांडे तर आभार प्रदर्शन प्रा.पुनम बोमनवाड आणि प्रास्ताविक प्रा.डॉ. आशा गित्ते यांनी केले .
क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करून व मान्यवरांच्या सत्काराने कार्यक्रम सुरू करण्यात आले . महाविद्यालयातील प्राध्यापिका व शिक्षकेत्तर महिला कर्मचारी दरवर्षी मकर संक्रांतीच्या निमित्ताने हळदी – कुंकवाचा कार्यक्रम आयोजित करीत असत . परंतु या वर्षी हळदी – कुंकवाचा कार्यक्रम रद्द करून महाविद्यालयात शिक्षण घेणाऱ्या किशोरवयीन मुलींना मासिक पाळीच्या वेळी होणाऱ्या त्रासापासून वाचण्यासाठी आणि त्यांच्या आरोग्य व जीवनशैली विषयी जागरूकता निर्माण करण्यासाठी कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता . महिला कर्मचाऱ्यांनी स्वखर्चाने महाविद्यालयाला सँनिटरी नँपकिन व डिस्पोजल मशीन भेट दिली आहे . जे तालुक्यातील महाविद्यालयातच नव्हे तर विद्यापीठ परिक्षेत्रातील महाविद्यालयातील हे अभिनव उपक्रम आहे . पहिल्या सत्राचे अध्यक्षीय समारोप करताना प्राचार्य डॉ. अडकिणे यांनी महाविद्यालयातील महिला सक्षमीकरणाच्या दृष्टीने सँनिटरी नँपकिन व डिस्पोजल मशीन देणाऱ्या सर्व महिला कर्मचाऱ्यांचे अभिनंदन केले . विद्यार्थिनींच्या सबलीकरणासाठी ” नारी सुरक्षा कवच अभियान ” राबविण्यात येत आहे . या संधीचा लाभ सर्वांनी घ्यावा . मुलीच्या सक्षमीकरणासाठी महाविद्यालयाच्या सुवर्णमहोत्सवी वर्षाच्या निमित्ताने विविध शैक्षणिक व सामाजिक दायित्व ओळखून कार्यक्रम घेतले जात आहेत . समाजातील महिला सुरक्षित व स्वस्थ असेल तरच सक्षम पिढी निर्माण होण्यासाठी मदत होते असे विचार व्यक्त केले .
दुसऱ्या सत्रात साहित्यकार चांडोळकर यांनी महाविद्यालयीन जीवनातील आनंदी क्षणाचा मनमुराद आनंद घ्यावा . मुलींना स्वतःच्या पायावर उभे राहताना समाजातील चांगल्या – वाईट गोष्टींचा नीट अभ्यास केला पाहिजे . मुलगी यशस्वी झाली तर केवळ स्वतःचा व परिवाराचे नाव मोठे करत नाही तर महाविद्यालयाची देखील ओळख निर्माण करून देत असते असे विचार मांडले . डॉ. कौरवार यांनी भाषणात महाविद्यालयीन किशोरवयीन मुलींची अवस्था , आरोग्यातील होणारे बदल , स्वस्थ शरीरासाठी घ्यावयाची काळजी , आहार , व्यायाम आणि सँनिटरी नँपकिन वापरण्याचे फायदे आणि गैरवापर केल्यास होणारे दुष्परिणाम सांगितले . कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी प्रा.डॉ. आशा गित्ते , प्रा.सौ.नयना चवळे , श्रीमती उषा वारकड , श्रीमती वैशाली पाटील , प्रा.डॉ. मनिषा देशपांडे , प्रा.डॉ. तेजस्विनी कुलकर्णी , प्रा.पुनम बोमनवाड यांनी प्रयत्न केले . यावेळी बहुसंख्येने विद्यार्थिनी , महिला पालक , कर्मचारी उपस्थित होते .