दैनिक चालु वार्ता बीड जिल्हा प्रतिनिधी -बालाजी देशमुख
आ. नमिता मुंदडा यांच्या पाठपुराव्याने मिळाला अडीच कोटींचा निधी
बीड/अंबाजोगाई – केज विधानसभा मतदार संघाच्या आ. नमिता अक्षय मुंदडा यांच्या पाठपुराव्यानंतर अंबाजोगाईतील सह दुय्यम निबंधक कार्यालयाच्या नवीन इमारतीसाठी अडीच कोटींच्या निधीस राज्य शासनाने मंजुरी दिली आहे. यासंबंधीचा शासनादेश शुक्रवारी (दि.२४) निर्गमित करण्यात आला.
शांत आणि सुसंस्कृत वातावरणामुळे अंबाजोगाईत स्थायिक होण्याकडे लोकांचा कल आहे. त्यामुळे येथील जमीन, मालमत्तेच्या किमती अफाट वाढलेल्या असल्या तरी खरेदीविक्रीचे व्यवहार मोठ्या प्रमाणावर होतात. त्यामुळे येथील सह दुय्यम निबंधक कार्यालयात प्रचंड गर्दी असते. सध्या हे कार्यालय नगर पालिका वाचनालयाच्या इमारतीत आहे. वाढती गर्दी आणि अपुरी जागा यामुळे नागरिकांना होणार त्रास लक्षात घेत आ. नमिता मुंदडा यांनी मागील अडीच वर्षांपासून रजिस्ट्री ऑफिसच्या नवीन इमारतीसाठी पाठपुरावा सुरू केला होता. आ. मुंदडा आणि अक्षय मुंदडा यांनी महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांची भेट घेऊन त्यांच्याकडेही याबाबत मागणी लावून धरली होती. अखेर त्यांच्या प्रयत्नांना यश आले असून शासनाने अंबाजोगाई येथील सह दुय्यम निबंधक कार्यालयाच्या नवीन इमारतीसाठी २ कोटी ५३ लाखाचा निधी मंजूर केला आहे. माता रमाई आंबेडकर चौक परिसरात रजिस्ट्री ऑफिसची भव्य आणि सुसज्ज इमारत उभारण्यात येणार असल्याची माहिती आ. नमिता मुंदडा यांनी दिली. आगामी आर्थिक वर्षात या कामाला सुरुवात होणार आहे. यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील, भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजाताई मुंडे, खा. प्रीतमताई मुंडे यांचे आ. नमिता मुंदडा यांनी आभार मानले आहेत.