दैनिक चालु वार्ता देगलूर प्रतिनिधी- संतोष मनधरणे
देगलूर;नांदेड शहर व परिसरातील गुन्हेगारीवर नियंत्रण मिळवण्यात पोलिसांना अपयश आले असल्याने दररोज कुठे ना कुठे चिकू, खंजर तलवारी व गावठी कट्टे तर सापडतच आहेत पण खुनाच्या घटनाही कमी होत नसून. सिडको भागातील जुन्या वसंतराव नाईक महाविद्यालया समोर गोळीबार करून एकाची हत्या केल्याची घटना शनिवारी रात्री ९ वाजेच्या दरम्यान घडली. या घटनेमुळे शहर परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे नांदेडमध्ये पुन्हा गोळीबार झाल्यामुळे शहरात खळबळ उडाली.
सिडको येथील राज प्रदीप सरपे (२२) रा. सिडको हा रात्री ९ वाजताच्या दरम्यान सिडको येथील जुने नाईक महाविद्यालया समोरून जात असताना, अज्ञात मारेक- यांनी पिस्तुलमधून त्याच्यावर गोळीबार केला. यात गंभीर जखमी झाला. यानंतर पुढील उपचारासाठी त्याला विष्णुपुरी येथील शासकीय रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.
अज्ञात मारेक-यांनी नेमकी हत्या कोणत्या कारणावरून करण्यात आली हे समजू शकले नाही. या घटनेनंतर आरोपी घटना स्थळवरून फरार झाला. या प्रकरणी वृत्त लिहीपर्यंत ग्रामीण पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद करण्याची प्रक्रिया सुरू होती. नांदेड जिल्ह्यातील पोलीस यंत्रणेला कायदा व सुव्यवस्थेपेक्षा अवैध धंद्यातून मिळणाऱ्या मलीदा महत्वाचा वाटत असल्याने गुन्हेगारीत प्रचंड वाढ झाली आहे.
वरिष्ठ पोलीस अधिकारी बदली व अवैध धंद्याच्या माध्यमातून प्रचंड पैसा कमवत असल्याने जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्थेचा बोजवारा उडाला आहे. जिल्ह्यातील परिस्थिती वरचेवर गंभीर होत असताना गुन्हेगार आणि अवैध धंद्याला आळा घालण्यासाठी एकही राजकीय नेता पुढाकार घेत नसल्याने या सर्व प्रकाराला त्यांचाही पाठींबा तर नाही ना अशी शंका व्यक्त केल्या जात आहे.