दैनिक चालु वार्ता प्रतिनिधी गंगाखेड-प्रेम सावंत
गंगाखेड: शहरातील गोदावरी नदी पात्रात परभणी जिल्हा ऐतिहासिक वारसा समिती कडून पाहणी करत असताना अंधारा महादेव मंदिर व लक्ष्मीनारायण मंदिराचे अवशेष आढळले.
इतिहास संशोधक प्रा.डॉ.अविनाश खोकले व सुधीर देऊळगावकर हे पाहणी करत असताना गंगाखेडची ऐतिहासिक ओळख असणारे 11 व 12 व्या शतकातील अंधारा महादेव मंदिर, लक्ष्मी नारायण मंदिरासह इतर ठिकाणचे अवशेष व शिलालेख गोदावरी नदी पात्रात जिल्हाधिकारी परभणी कार्यालयाकडून आलेले सुधीर देऊळगावकर फोटोग्राफी करत असताना आढळून आले असल्याची माहिती परभणी जिल्हा ऐतिहासिक वारसा समिती सदस्य तथा इतिहास संशोधक प्रा.डॉ.अविनाश खोकले यांनी दिली.
गंगाखेड शहराला ऐतिहासिक वारसा असल्याचे शहराच्या ठेवणीवरून तसेच काही ऐतिहासिक वास्तू व प्राचीन मंदिरावरून दिसून येते.जवळपासच्या परिसरात गोदातटावर मोठे शहर म्हणून गंगाखेडची ओळख असावी असेही शहराच्या जुन्या ठेवणी वरून दिसून येत असल्याचे मत डॉ.खोकले यांनी व्यक्त केले.
परभणी जिल्ह्यातील ऐतिहासिक वारसा जपण्यासाठी ऐतिहासिक वास्तू व अवशेषांची माहिती पुस्तिका तयार करण्याचे काम चालू आहे.
परभणी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या माध्यमातून छायाचित्रण जमा करण्यासाठी सुधीर देऊळगावकर हे आले असताना त्यांच्यासोबत परभणी जिल्हा ऐतिहासिक वारसा समिती सदस्य तथा शेषाबाई मुंढे महाविद्यालयातील इतिहास संशोधक प्रा.डॉ.अविनाश खोकले यांनी शहरातील अति प्राचीन असलेले चिंतामणी मंदिर, अंधारा महादेव मंदिर, लक्ष्मीनारायण मंदिर व गोदावरी पात्रातील नृसिंह मंदिर या हेमाडपंथी अति प्राचीन मंदिराची नोंद तसेच छायाचित्रण घेण्यासाठी आले असताना नृसिंह मंदिराचे छायाचित्रण करत असताना गोदावरी नदी पात्रात त्यांना गंगाखेडच्या ऐतिहासिक प्राचीन खुणा सांगणारे शिल्प अवशेष दिसून आले. यात विष्णू मूर्तीचे अलंकृत शीर, थोडे भग्न झालेले महाकाय शिवलिंग, द्वारशाखा चे वैष्णव शिल्प, भारवाहक, सती शिळा, नाग शिल्प, भग्न झालेला विशाल नंदी तसेच अनेक शिल्प भग्न अवस्थेत गोदावरी नदी पात्रात पाहायला मिळाले.
हे शिल्प वजनाला व दिसायला विशाल असल्याचे त्यांनी सांगितले.
अकराव्या बाराव्या शतकापासून म्हणजेच चालुक्य,यादव,राजघराणे काळापासून असणारा सांस्कृतिक ऐतिहासिक वारसा तसेच छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जन्मापूर्वीचा म्हणजेच शके 1510 चा देवनागरी लिपी व मोडी लिपीचा प्रभाव जाणवणारा अहमदनगर येथील इस्माईल निजामशाह याच्या समकालीन हा शिलालेख असावा.या ऐतिहासिक गोष्टीची पुष्टी परभणी जिल्हा ऐतिहासिक वारसा समिती सदस्य प्रा डॉ अविनाश खोकले यांनी दिली.
गंगाखेड शहर हे अति प्राचीन असल्याचे शहराच्या ठेवणीवरून नक्कीच दिसून येते मात्र राजघराणे पूर्व ऐतिहासिक गोष्टी कुठेही ऐकण्यात नाहीत.मात्र ऐतिहासिक काळात धार्मिक गंगाखेडची नोंद नक्कीच आहे असे दिसून येते.
गंगाखेड सारख्या ऐतिहासिक शहराला अतिप्राचीन वारसा आहे सहज पाहणी करण्यासाठी गेलो असताना चालुक्य यादव राजघराणे काळापासूनचा सांस्कृतिक ऐतिहासिक वारसा असलेला खजिना मिळाला आहे.याची किंमत खूप मोठी असून गंगाखेड सारख्या ऐतिहासिक शहराला चालना देण्यासाठी वाढ होईल यासाठी असे अनेक महत्वाचे ऐतिहासिक अवशेष जपून ठेवण्याची गरज असल्याचे मत प्रा.डॉ.अविनाश खोकले यांनी दैनिक चालु वार्ता शी बोलताना मांडले.