दैनिक चालु वार्ता वृत्तसेवा
नवी दिल्ली : हींडेनबर्गच्या अहवालानंतर अदानी समुहाच्या शेअर्समध्ये मोठी घसरण झाली होती. तसेच अदानी समुहात मोठ्या प्रमाणात गुंतवणूक केलेल्या एलआयसीची गुतंवणूकही तोट्याच्या उंबरठ्यावर होती.
एलआयसीची अदानी समुहातील गुंतवणूक आणि होणार संभाव्य तोटा याबाबत चर्चा सुरू होती. त्यामुळे विमाधारक आणि गुंतवणूकदारांमध्ये चिंतेचे वातावरण होते. मात्र, गेल्या तीन दिवसांपासून अदानी समुहाच्या शेअरमध्ये तेजी आली आहे. तसेच एलआयसीची गुंदतवणूकही नफ्यात आल्याने विमाधारक आणि गुंतवणूकदारांना दिलासा मिळाला आहे.
एलआयसीने अदानी समूहातील सात कंपन्यांमध्ये केलेली 30,127 कोटी रुपयांची गुंतवणूक गेल्या आठवडय़ात तोटय़ाच्या उंबरठय़ावर आली होती. जनतेने विश्वासाने एलआयसीमध्ये पैसे गुंतवले आहेत. त्यांची एसआयसीमधील गुंतवणूक धोक्यात असल्याची चर्चा होती. त्यामुळे विमाधारक चिंतेत होते. गेल्या दोन सत्रात अदानी समूहातील कंपन्यांमध्ये आलेल्या तेजीमुळे एलआयसीच्या अदानी समभागांतील गुंतवणुकीचे मूल्य 9 हजार कोटी रुपयांनी वधारून 39,068.34 कोटी रुपयांवर पोहोचले आहे.
भांडवली बाजाराकडून उपलब्ध आकडेवारीनुसार, एलआयसीच्या अदानी समभागातील गुंतवणुकीचे मूल्य 24 जानेवारीला सुमारे 81,236 कोटी रुपये होते. मात्र, ‘हिंडेनबर्ग’ अहवालातील आरोपांनंतर अदानी समूहातील सर्वच कंपन्यांच्या समभागांची मोठी घसरण झाली. एलआयसीच्या अदानी समभागांतील गुंतवणुकीचे मूल्य घसरून 24 फेब्रुवारी रोजी 29,893.13 कोटी रुपयांवर घसरले होते.
एलआयसीने 30 जानेवारीपासून अदानी समूहातील कोणत्याच कंपन्यांमध्ये नवीन गुंतवणूक केलेली नाही किंवा समभाग विक्रीही केलेली नाही. 30 सप्टेंबर 2022 पर्यंत एलआयसीच्या व्यवस्थापनाखालील एकूण मालमत्ता 41.66 लाख कोटींहून अधिक होती. एलआयसीचे अदानी समूहातील गुंतवणूक मूल्य एकूण व्यवस्थापनाखालील मालमत्तेच्या 1 टक्क्यापेक्षा कमी आहे. एलआयसीची सर्वाधिक गुंतवणूकवाढ ‘अदानी टोटल गॅस’मध्ये झाली आहे. ती 2020च्या सप्टेंबरमध्ये 1 टक्क्यापेक्षा कमी होती, मात्र सप्टेंबर 2022 मध्ये ती 5.77 टक्के झाली. अदानी पोर्ट्स, अदानी पॉवर, अदानी विल्मर या कंपन्यांतील तिच्या गुंतवणुकीत फारशी वाढ झालेली नाही.