दैनिक चालु वार्ता वृत्तसेवा –
नवी दिल्ली : मेघालयाचे १३ वे मुख्यमंत्री म्हणून एनपीपीचे अध्यक्ष कॉनराड संगमा यांनी आज मंगळवारी (दि.७) सलग दुसऱ्यांदा शपथ घेतली.
प्रीस्टोन तायन्सॉन्ग आणि स्नियावभालंग धर यांनी मेघालयाचे उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. संगमा यांच्या मंत्रिमंडळात १२ मंत्र्यांचा समावेश करण्यात आला आहे. अबू ताहेर मोंडल, किरमेन शिल्ला, मार्कीस एन मारक, राक्कम ए संगमा, अलेक्झांडर लालू हेक, डॉ. अँपरीन लिंगडोह, पॉल लिंगडोह आणि कमिंगोन यम्बोन यांनी नवीन NPP नेतृत्वाखालील मेघालय सरकारमध्ये मंत्री म्हणून शपथ घेतली. त्यांना मेघालयाचे राज्यपाल फागू चौहान यांनी पद आणि गोपनियतेची शपथ दिली. या शपथविधी सोहळ्यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा उपस्थित होते. नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीत संगमा यांच्या एनपीपी पक्षाने ५९ पैकी २६ जागा जिंकल्या आहेत.
नवीन सरकारच्या शपथविधीसाठी राजभवनाकडे रवाना होण्यापूर्वी कॉनराड संगमा आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी प्रार्थना सभेला उपस्थित राहून आर्चबिशप यांच्याकडून आशीर्वाद घेतले होते.
नवीन सरकारच्या शपथविधीसाठी राजभवनाकडे रवाना होण्यापूर्वी कॉनराड संगमा यांनी सर्व कॅबिनेट मंत्र्यांसह प्रार्थना सभेला उपस्थिती लावली होती. मेघालयातील प्रादेशिक पक्ष यूडीपी आणि पीडीएफ यांनी कॉनराड संगमा यांच्या एनपीपी नेतृत्वाखालील आघाडी सरकारला पाठिंबा दर्शवला आहे. यामुळे संगमा यांना पाठिंबा देणाऱ्या आमदारांचे संख्याबळ ४५ झाले आहे. गेल्या शनिवारपर्यंत संगमा यांना भाजप आणि हिल स्टेट पीपल्स डेमोक्रॅटिक पार्टी (एचएसपीडीपी) च्या प्रत्येकी दोन आणि अपक्षांसह ३२ आमदारांचा पाठिंबा होता. आता यूडीपी आणि पीडीएफ ह्या दोन पक्षांच्या आमदारांनी संगमांना पाठिंबा दर्शवला आहे. तर चार आमदार असलेली न्यू व्हॉईस ऑफ पीपल्स पार्टी (व्हीपीपी) आणि प्रत्येकी पाच आमदार असलेले काँग्रेस आणि टीएमसी विरोधी बाकावर बसणार आहेत.