
दैनिक चालु वार्ता बीड जिल्हा प्रतिनिधी-बालाजी देशमुख
बीड जिल्ह्यातल्या आष्टी तालुक्यातील पिंपळेश्वर महादेव विठोबा देवस्थान, रामचंद्र देवस्थान यासह जिल्ह्यातल्या अन्य हिंदू देवस्थानाच्या जमीनी हडप करण्याचा प्रकार झालेला असताना या प्रकरणी न्यायालयाच्या आदेशावर गुन्हा दाखल झालेला असताना या प्रकरणाचा तपास जलदगतीने होत नाही उलट या प्रकरणातील फिर्यादीची नि: शुल्क सुरक्षा व्यवस्था काढून घेऊन त्याच्या विरोधात बलात्काराचा खोटा गुन्हा दाखल करण्यात येतो, हे निंदनीय असल्याचे सांगत राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष आ. जयंत पाटील यांनी या प्रकरणी दोषींवर कारवाई होणार का? त्यांचे नाव पटलावर ठेवले जाणार का? असे सवाल गृहमंत्र्यांना विचारले. त्यावेळी या प्रकरणी तीन ते चार महिन्यात तपास प्रगतीपथावर नेण्याच्या सूचना दिल्या जातील आणि बीड जिल्ह्यातील देवस्थानाच्या जमीनी हडप करणाऱ्यांवर कठोरातील कठोर कारवाई केली जाईल, असे आश्वासन गृहमंत्री देवेंद्र फडणवीस ज्यांनी सभागृहात दिले. त्यामुळे या प्रकरणात अडकलेल्या सर्वांचेच धाबे दणाणले आहेत.अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या दुसऱ्या आठवड्यात बीड जिल्ह्यातील देवस्थान जमीनीचे प्रकरण गाजले. राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष तथा आ. जयंत पाटील यांनी हे प्रकरण विधानसभेत उचलले. त्यांनी सरकारसह गृहमंत्र्यांना धारेवर धरत आष्टी तालुक्यातील पिंपळेश्वर, विठोबा, रामचंद्र यासह अन्य देवस्थानांच्या शेकडो एकर जमीन खासगी व्यक्तीच्या नावे झालेल्या आहेत. त्याविरुद्ध गुन्हा दाखल असला तरी पोलीस आणि लाचलूचपत प्रतिबंधक विभाग या प्रकरणाचा तपास जलदगतीने करत नसल्याचा आरोप करत या प्रकरणातील फिर्यादीलाच त्रास दिला जात असल्याचे म्हटले. ज्या तक्रारदाराने घास दाखवून हे प्रकरण बाहेर काढले त्याविरुद्ध पेस्कोसारखा बलात्काराचा खोटा गुन्हा दाखल करण्यात आला. तो गुन्हा सरकार परत घेणार का ? अन् या प्रकरणाचा तपास तात्काळ पुर्णत्वाकडे नेण्यासाठी निश्चित वेळ ठरविली जाणार का आणि या प्रकरणात अडकलेल्या आरोपींची नावे पटलावर ठेवले जाणार का? असे प्रश्न उपस्थित केल्यानंतर उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणात कोणीही अडकलेले असो त्यावर कठोर कारवाई केली जाईल आणि हा तपास तीन ते चार महिन्यात पुर्णत्वाकडे न्यावा, अशा सूचना पोलिसांना दिल्या जातील, हे सांगतानाच बीड जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणावर देवस्थानाच्या जमीनी हडप केल्या जात असल्याचे सांगत फडणवीसांनी बीड तालुक्यातील सहा, बीड शहरातील सहा, धारूर 2, गेवराई 1, अंबाजोगाई 3, आष्टी 12, माजलगाव 1 आणि केज या प्रकरणातील दोषींवर कठोर कारवाई केली जाणार असल्याचे म्हटले. बीड जिल्ह्यातला जमीन घोटाळा विधानसभेत गाजल्यामुळे या घोटाळ्यात हात ओले करणाऱ्या अधिकाऱ्यांसह दोषींचे धाबे दणाणले आहेत. सदरच्या प्रकरणात जयंत पाटलांसह दिलीप वळसे पाटील आणि आ. प्रकाश सोळंके यांनी प्रश्नोत्तरामध्ये सहभाग नोंदवला. आ. सोळंकेंनी तर जिल्ह्यात देवस्थान आणि वक्फ बोर्ड यांच्या जमीनी हडपल्या प्रकरणाचे तब्बल 94 प्रकरणे असल्याचे आणि तशा आशयाचे अफिडेविट दस्तुरखुद्द जिल्हाधिकाऱ्यांनी न्यायालयात दिल्याचे आ. सोळंकेंनी सांगितले. या सर्व प्रकरणात तपास जलदगतीने करण्याचे आदेश देण्यात येतील, असे फडणवीसांनी म्हटले.