दैनिक चालु वार्ता वाशीम प्रतिनिधी -वसंत खडसे
वाशिम : जिल्ह्यातील रिसोड तालुक्यात येत असलेल्या शेलुखडसे येथील रांजणयेडी शेतशिवारात पूर्वजांनी नितांत श्रध्देतून स्थापन केलेल्या महादेवाच्या पिंडीवर स्वखर्चातून मंदीर उभारण्यात आले आहे. येथील व्यवसायाने वेल्डिंग वर्क शॉप चा उद्योग करणारे होतकरू तरुण अमोल मधुकर खडसे यांनी हे स्तुत्य कार्य केले आहे.
सदर शेतशिवारात स्थापित असलेले महादेवाचे स्थान सभोवतालच्या व गावातील भक्तांमध्ये जागृत देवस्थान म्हणून ओळखले जाते. त्यामुळे येथे नेहमीच महादेव भक्तांची वर्दळ असते तथापि, अमोल खडसे हे सुध्दा महादेवाचे निस्सीम भक्त असल्यामुळे त्यांनी येथे येणाऱ्या भक्तांची गैरसोय लक्षात घेऊन आपल्या दैनंदिन खर्चातून थोडी,थोडी बचत करत स्वखर्चाने उघड्या चौथऱ्यावर स्थित असलेल्या पिंडीवर मंदीर उभारण्याचे महत्त्वपूर्ण कार्य केले आहे. सदर मंदिरावर कलश रोहनचा कार्यक्रम नुकताच पार पडला असून त्या अनुषंगाने महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते. या निमित्ताने गावातील चंदनशेष बारी मंडळ व महीला भजनी मंडळाच्या वतीने भजनाचा कार्यक्रम झाला. सदर कार्यक्रमात गावातील ग्रामस्थांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला होता. शास्त्रोक्त पद्धतीने विधिवत पूजा करून कलश रोहन झाल्यानंतर महाप्रसादाचे वितरण झाले. गावकऱ्यांसह, आसपासच्या एकलासपुर, पाचंबा, गणेशपुर आदी गावातील महादेव भक्तांनी महाप्रसादाचा लाभ घेतला.