दैनिक चालु वार्ता चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी- दीपक कटकोजवार
चंद्रपूर जिल्ह्याचे अष्टपैलू व्यक्तिमत्त्व,राज्याचे सांस्कृतिक कार्य मंत्री व जिल्हा पालकमंत्री नामदार सुधीरभाऊ मुनगंटीवार यांच्या संकल्पनेतून व कार्यतत्पर भुमिकेतुन बल्लारपूर येथील उच्च दर्जाचे सागवानाचे विधीवत काष्ठपुजन करून बल्लारपूर ते चंद्रपूर असा प्रवास करीत काष्ठ शोभायात्रेचे आगमन २९ मार्चला विसापुर, राजीव गांधी अभियांत्रिकी महाविद्यालय, आराध्य दैवत माता महाकाली मंदिर, कस्तुरबा चौक , गांधी चौक ते मुख्य मार्गाने पुढे भ्रमण करीत जटपुरा गेट, प्रियदर्शनी चौक होऊन प्रसिद्ध चांदा क्लब ग्राउंड वर ही शोभायात्रा पोहचेल. यात्रेत रामायण मालिकेतील कलावंत अरूण गोविल (भगवान श्रीराम), दीपिका चिखलिया (सितामाई), सुनिल लाहोरी (भ्राता लक्ष्मण) यांचा सहभाग हे शोभायात्रेचे मुख्य आकर्षण ठरणार आहे. याकरिता प्रभु श्रीराम मंदिर अयोध्या काष्ठपुजन समिती चंद्रपूर चे अध्यक्ष व जिल्हा पालकमंत्री सुधीरभाऊ मुनगंटीवार यांनी यावरच आपले लक्ष पुर्णपणे केंद्रित केले असल्याने जिल्हाभर राममय वातावरण बनले आहे.रामभक्त त्या क्षणाची आतुरतेने वाट बघत आहे. रामाचे चैत्र नवरात्रोत्सव व काष्ठ पुजन व शोभायात्रा अशा स्वरूपाच्या दुग्धशर्करा योगाची यावेळी चंद्रपूर जिल्हा वासीयांना अनुभुती येणार आहे. चंद्रपूर शहराला अक्षरशः अयोध्या नगरीचे स्वरूप प्राप्त होईल असा अंदाज जनमानसात व्यक्त केल्या जात आहे. पालकमंत्री समर्थकांमध्ये कमालिचा उत्साह दिसून येत असुन चंद्रपूर शहरातील अनेक ठिकाणी रोशनाई, सजावटीसाठी सुरूवात झाली आहे. याच दिवशी रात्री सुप्रसिद्ध गायक कैलाश खेर यांच्या भक्तीमय गितांचा कार्यक्रम नामदार सुधीरभाऊ मुनगंटीवार यांच्या उपस्थितीत आयोजित करण्यात आला आहे.