
दैनिक चालु वार्ता -बीड जिल्हा प्रतिनिधी -बालाजी देशमुख
बीड —जिल्हा परिषद प्रायोगिक तत्वावर ग्रामपंचायत अंतर्गत नळपट्टी, घरपट्टी आदी वसुलीचे काम इच्छुक असणाऱ्या ग्रामपंचायतच्या वतीने महिला बचत गटांकडे देण्यात येणार आहे. त्यामुळे गावातील कर वसुलीचे कामही मोठ्या प्रमाणात होईल आणि बचत गटांना उत्पन्नात फायदा होईल. यासाठी प्रायोगिक तत्वावर बीड जिल्हा परिषदेच्या वतीने हा उपक्रम राबविण्यात येत असल्याचे पंचायत विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी मोकाटे यांनी सांगितले.
ग्रामसेवक करवसुलीसाठी गावात फिरला तर गावातील नागरिक पाहिजे तेवढा प्रतिसाद ग्रामसेवकाला देत नाहीत, उलट गावपातळीवरील राजकारणामुळे कर वसुलीसाठी त्रास होत असल्याने हे काम महिला बचत गटांकडे देण्या येणार आहे. सरपंच आणि ग्रामपंचायत सदस्य मताच्या राजकारणातून गावातील कर वसुलीकडे कानाडोळा करतात. त्यामुळे ग्रामपंचायतचे वसुलीचे उद्दीष्ट साध्य होत नाही. त्यामुळे यावर्षी इच्छुक असणाऱ्या ग्रामपंचायतींकडून बचत गटांकडे वसुलीचे काम सोपविण्यासंदर्भात प्रस्ताव मागविण्यात येत आहेत. आलेल्या प्रस्तावातून छानणी करून गावातीलच पात्र असणाऱ्या महिला बचतगटांना हे काम देण्यात येणार आहे. करवसुलीतून पाच ते दहा टक्के कमिशन या बचत गटांना देण्यात येणार आहे. त्यामुळे वसुली मोठ्या प्रमाणात वाढे, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.